नवी मुंबईत स्कूल व्हॅनची कारला धडक; विद्यार्थ्यांसह तीन जखमी, चालक तर्राट असल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाशी येथे आज सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना स्कूल व्हॅनचा भीषण अपघात झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांसह चालकाला जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने दोन्ही मुले किरकोळ जखमी झाली आहेत. मात्र या घटनेने पुन्हा एकदा बेदरकार स्कूल व्हॅनचालकांच्या हल गर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान अपघातग्रस्त व्हॅनचा चालक तर्राट असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनी केला आहे.

वाशी सेक्टर ९ येथून शाळेच्या दिशेने जाणाऱ्या सेक्टर १६ मधील मार्गावर हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त स्कूल व्हॅनमध्ये दोनच विद्यार्थी होते. रस्ता काहीसा मोकळा असल्याने व्हॅन जोरात चालवण्याच्या नादात व्हॅनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका अन्य गाडीला धडकली. अपघात एवढ्या जोरात झाला की व्हॅनची पुढची बाजू पूर्णपणे चेपून गेली. व्हॅनच्या स्टिअरिंगवर चालक जोरात आदळल्याने जखमी झाला. तर गाडीतील दोन विद्यार्थीही किरकोळ जखमी असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली. व्हॅनचालकाने मद्य प्राशन केले होते का याबाबत वैद्यकीय अहवाल आल्यावर सांगता येईल, असेही चांदेकर यांनी सांगितले.