
सरकारी शाळेतील शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना आता मुलांना शिकवण्यासोबतच खबऱ्याचेही काम करावे लागणार आहे. शिक्षकांना गाव, शहरातील दारुड्यांचा आणि दारु तस्करांचा शोध घेऊन ही माहिती सरकारला द्यावी लागण आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना हे काम करावे लागणार आहे. याबाबत बिहार सरकारने एक आदेशच जारी केला आहे.
बिहार राज्याच्या शिक्षण विभागाने शुक्रवारी एक आदेश जारी केला आहे. यात सरकारी शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना दारु पिणाऱ्या आणि दारुची अवैधरित्या विक्री करणाऱ्या लोकांची माहिती जमा करण्यास सांगितले आहे. तसेच शाळा सुटल्यानंतर शाळेचा परिसर दारुचा अड्डा तर बनत नाहीय ना याकडेही शिक्षकांना कटाक्षाने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी याबाबत पत्रक जारी केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्यात दारुबंदी असतानाही काही लोक छुप्या पद्धतीने दारुची विक्री आणि सेवन करतात. दारुच्या सेवनामुळे फक्त ती सेवन करणारी व्यक्तीच नाही तर तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नशामुक्तीबाबत जागरुकता पसरवण्यासाठी शासनाने कडक पावले उचलण्याचे धोरण स्वीकारले आहे.
ओळख लपवणार
शिक्षक खबरी बनणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठीही सरकारने पावले उचलली आहेत. कोणत्याही शिक्षकाला याबाबत माहिती देण्यासाठी पोलीस स्थानकात जाण्याची आवश्यकता नाही. टोल फ्री मोबाईल नंबरवर मेसेज किंवा फोन करून याची माहिती शिक्षक देऊ शकतात. यासाठी शिक्षकांची ओळखही लपवली जाणार आहे.
मृत्यूतांडव
बिहारमध्ये 2016 मध्ये दारुबंदी कायदा लागू करण्यात आला. मात्र तरीही राज्यात छप्या पद्धतीने दारुची विक्री होते. यामुळे अनेक जणांना जीवही गमवावा लागला आहे. बक्सरमध्ये काही दिवसांपूर्वी विषारी दारु प्यायल्याने 5 लोकांचा मृत्यू झाला होता, तर सारणमध्ये 17 लोकांनी जीव गमावला होता. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तब्बल 40 लोकांचा विषारी दारुमुळे मृत्यू झाला आहे.



























































