विज्ञान मेळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजच्या मुलांना, विद्यार्थ्यांना विज्ञान कळावे, सजगता निर्माण व्हावी, विज्ञानविषयक डोळस दृष्टी मिळावी म्हणून आज आणि उद्या विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले आहे.

विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करण्याची संधी मिळावी, विज्ञानाची तत्त्वे समजावीत, त्यांच्यातील विज्ञानाविषयीचे कुतूहल वाढावे या उद्देशाने इ.7वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांकरिता मराठी विज्ञान परिषद आणि इंडियन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त ‘भव्य विज्ञान मेळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. 13 जानेवारीपर्यंत राजा शिवाजी विद्यालय संकुलात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना या मेळाव्यात प्रत्यक्ष सहभागी होता येईल.

या विज्ञान मेळ्याबाबत विज्ञान अभ्यासक प्रदीप म्हात्रे सांगतात, बर्‍याचदा मुलांना हाताने प्रयोग करण्याची संधी मिळत नाही, काही वेळा शाळेलाही मर्यादा येतात. मुलांना विज्ञानाचे नवनवे प्रयोग करण्यासाठी या मेळ्याच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. अंदाजे 2000 विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाली आहेत. शेवटच्या दिवशी जी मुलं शाळांमार्फत आलेली नाहीत ती वैयक्तिकरीत्या आपल्या पालक किंवा शिक्षकांसोबत विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणिशास्त्र आणि गणित या विषयांवर हे प्रदर्शन भरलेलं आहे. यामध्ये काही प्रयोग मुलांना स्वतः करायला मिळणार आहेत. शिवाय काही ठिकाणी प्रात्यक्षिकं करण्याची संधीही देण्यात आली आहे.  

पुस्तकांचं दालन

विज्ञान विषयावर आधारित पुस्तके विकत घेता यावीत याकरिता विज्ञान विषयक पुस्तकांचं दालन या मेळ्यात उभारण्यात आलं आहे. यामध्ये मराठी विज्ञान परिषद आणि मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा प्रामुख्याने समावेश आहे.  

मेळ्याचे वैशिष्ट्य

दिवसभरात 4 सत्रांमध्ये हा मेळा भरला असून त्यामध्ये प्रयोग-प्रात्यक्षिके, खुले प्रदर्शन, विशेष-प्रयोग, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी अशा दालनांचा समावेश आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक, सर्वांसाठी हा विज्ञान मेळा खुला आणि विनामूल्य आहे.

आंतरराष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान महोत्सव

निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा विज्ञानाशी कसा संबंध आहे, याची माहिती मुलांना व्हावी याकरिता एन.ई.एस. इंटरनॅशनल स्कूल, मुंबई आणि दक्षिण आशियाई आय.बी. शाळा असोसिएशन (एसएआयबीएसए) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज 8व्या आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सवात आयोजन करण्यात आले आहे. एन.ई.एस. इंटरनॅशनल स्कूल आणि आयबी वर्ल्ड स्कूल, मलाबार हिल रोड, स्वप्ननगरी, मुलुंड (पश्चिम) येथे या महोत्सवाचा आनंद विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना घेता येईल.

‘सायन्स फॉर ह्युमॅनिटी’ ही या वर्षीची थीम आहे. याकरिता विविध शाळेतून 812 पेक्षा जास्त विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. या थीमअंतर्गत विद्यार्थ्यांनी मॅग्नेटिक सिटी, इको होम, स्मार्ट कार पार्क, स्मार्ट सिटी, रोबोट्स आणि मशीन, सौर उपग्रह, ब्रेन पॉवर, स्मोक ट्रान्सफॉर्मर, यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. तसेच स्मार्ट डस्टबिन, महासागर स्वच्छता, पूर शोधक असे बरेच विषय थिमनुसार या महोत्सवाअंतर्गत पाहण्याची संधी मिळणार आहे.

अनोख्या स्पर्धा

क्विझ स्पर्धा, वैज्ञानिक चित्रकला आणि चित्रकला स्पर्धा, स्पेस सायन्सवर नृत्य स्पर्धा, इको फ्रेंडली आणि बायो वापरून ज्वेलरी डिझाइन अशा वेगवेगळ्या विज्ञानविषयक स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शिवाय या महोत्सवाचे मुख्य आकर्षण सायन्स चॅलेंज, डी. वाय. सायन्स मॅजिक शो आणि स्टेट ऑफ द आर्ट रोबोटिक्स यांचा समावेश आहे.

स्वतः प्रयोग करण्याची मजा अनुभवली

या मेळ्यात आम्हाला प्रयोग बघायला मिळाले आणि प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने प्रयोग केले. हृदयाचे ठोके तपासले. ते ऐकायला खूप छान वाटलं. रासायनिक पदार्थ विजेने भारीत असतात का ते तपासलं. शिवाय वनस्पतींचे वेगवेगळे नमुने, त्यांचे अवयव येथे आम्हाला बघायला मिळाले. त्याविषयी माहिती मिळाली. याशिवाय स्वतःच्या हाताने प्रयोग करताना इलेक्ट्रिक करंट पाणी आणि मिठात असतो, हे सगळे प्रयोग स्वतःच्या हाताने करण्यात आणि बघण्यात एक वेगळीच मजा जाणवत होती. – सज्ञेया सदानंद सावंत, आय.ई.एस. पाटकर विद्यालय, डोंबिवली. इयत्ता 9वी

सर्व प्रयोग आवडले

प्रत्येक प्रयोगाविषयी इथल्या दादा-दीदींनी खूप समजावून सांगितलं. प्रत्येक प्रयोगाचं विश्लेषण करून सांगितलं. येथील प्रयोग आमच्याकडून करून घेतले गेले. त्यामुळे खूप छान वाटलं. मी माझ्या एका मित्राच्या हृदयाचे ठोके ऐकले. मला हा प्रयोग खूप आवडला. प्रत्यक्ष प्रयोग करायला मिळाले, ते करताना आमचे शिक्षक बरोबर होते. हा सगळाच विज्ञान मेळा मला खूप आवडला. – विक्रम दीपक प्रधान, राजा शिवाजी विद्यालय, दादर, इयत्ता 8वी

प्रयोगांमुळे विषय लक्षात राहील

शाळेत विज्ञान विषय पुस्तकातून शिकवतात, इथे आम्हाला सारे प्रयोग प्रत्यक्षात बघायला आणि करायला मिळाले. हे आम्हाला पुस्तकातून कळलंही नसतं. ते कसे बनवतात ते शिकले. वनस्पतींचे विविध प्रकार बघितले, प्रयोगातले बारकावे लक्षात आले. हा विषय या प्रयोगांमुळे लक्षात राहू शकतो. – गौरी बोरसे, आय.ई.एस. पाटकर विद्यालय, भांडुप, इयत्ता 9वी