
त्वचेला खाज येणे ही तशी सामान्य बाब आहे. कधी ही खाज त्वचेला संसर्ग झाल्यामुळे येते तर कधी उगाचच येते. यामुळे खाज येण्यामागचे नेमके कारण आपल्याला कळत नाही. यावर अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामधील संशोधकांनी नुकतच एक संशोधन केले. त्यात आपल्या मणक्यातील हाडेच मेंदूपर्यंत खाजेचे संकेत पोहचवत असल्याचे समोर आले. तसेच ही खाज त्वचा विकाराबरोबरच मधुमेह किंवा कॅन्सरमुळे येऊ शकते असेही संशोधकांना संशोधनात आढळले आहे. ‘जर्नल ऑफ द मॅकेनिकल बिहेवियर ऑफ बायोमेडिकल मटेरियल्स’ मध्ये यावर लेखही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यातील माहितीनुसार कॅलिफॉर्नियातील साल्क इन्स्टीट्यूटमधील संशोधकांनी त्वचा विकारांवर नुकतेच संशोधन केले. त्वचेला खाज आल्याच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहचवण्याचे काम वेगवेगळ्या संवेदन कोशिका करतात. पण मेंदूपर्यंत संवेदना पोहचवण्यासाठी त्यांना मणक्यातूनच जावे लागते. मणक्यातील हाडांमध्ये न्यूरॉन्सचा एक सेट असतो. जो संवेदना वाहण्याचे काम करत असल्याचे संशोधनादरम्यान आढळले. तसेच रक्तात साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास त्वचेला खाज सुटते. तर कधी दूषित पाण्यातून गेल्यास जंतूसंसर्गामुळे त्वचेला खाज सुटत असल्याचे समोर आले . त्याचबरोबर कॅन्सरचे लक्षण म्हणूनही त्वचेला खाज सुटू शकते असा दावा संशोधकांनी केला आहे.