
आंबेनळी घाटात पुन्हा एकदा मृत्यूने अक्षरश: तांडव घातले. दापोलीच्या हर्णे बीचवरून विकेंड साजरा करून सातारा येथे निघालेली पर्यटकांची भरधाव स्कॉपिओ आंबेनळी घाटातील दाभीळ गावाच्या हद्दीत दीड ते दोन हजार फूट खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत 18 ते 25 वयोगटांतील आठ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे ही दुर्घटना शनिवारी रात्री घडून 24 तास उलटले तरी याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता. रविवारी दुपारपर्यंत मुले घरी न परतल्याने पालकांनी शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात मृत तरुणांच्या मोबाईलचे लोकेशन आंबेनळी घाटातील दरीत ट्रेस झाल्याने या अपघाताची माहिती समोर आली. त्यानंतर पोलीस, रेस्क्यू टीमच्या पथकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रविवारी रात्री सर्च ऑपरेशन सुरू केले.
मृत्यू झालेले सर्व तरुण साताऱयाच्या कोरेगाव तालुक्यातील आसगावचे रहिवासी होते. दरम्यान या घटनेने 2018 मध्ये घडलेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या बस दुर्घटनेच्या कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत.
कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील आठ तरुण स्कॉर्पियो (एमएच 11 डीएन 2340) गाडीने विकेंड साजरा करण्यासाठी शुक्रवारी दापोली येथे गेले होते. शनिवारी हर्णे बीचवर मौजमजा करून सर्व तरुण रात्री दहा वाजता सातारा येथे परतत होते. मात्र आंबेनळी घाटातील दाभीळ गावाजवळ एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दोन हजार फूट दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशŠ चक्काचूर झाला असून सर्व पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या तरुणांच्या कुटुंबीयांनी रविवारी सकाळपासून शोधाशोध सुरू केल्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओचा अपघात झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलादपूर पोलीस, तहसीलदार तसेच महाबळेश्वर रेस्क्यू टीम, सीस्केप, भाटिया रेस्क्यू ग्रुप, प्रतापगड रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेऊन सर्च ऑपरेशन सुरू केले. अवघड मार्ग, खोल दरी, मध्यरात्रीची वेळ यामुळे शोधकार्य करताना अनके अडचणी येत होत्या. दरम्यान 24 तास उलटूनही या अपघाताची माहिती कोणत्याही यंत्रणेला नव्हती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
ड्रोन कॅमेऱ्याने स्पॉट शोधले
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी चार रेस्क्यू टीमला पाचारण केले. स्थानिक नागरिकही मदतकार्यासाठी घटनास्थळावर उपस्थित होते. मात्र ज्या ठिकाणी अपघात घडला ते ठिकाण अत्यंत उतरणीचे आणि अवघड.. त्यात मीठ्ठ काळोख यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे ड्रोन कॅमेरा सोडून मृतदेहांचे स्पॉट शोधण्यात आले. त्यानंतर टीमच्या सदस्यांनी दोरखंडाच्या मदतीने मृतदेह रस्त्यावर आणले.
रेस्क्यू टीमवर मधमाशांचा हल्ला
स्कॉर्पिओचा अपघात घडला त्या दरीत अनेक भागांत मधमाशांचे पोळे असून शोधकार्य करताना रेस्क्यू टीमच्या काही सदस्यांवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र प्राथमिक उपचार करून पुन्हा जखमी सदस्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
डॉक्टर, पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे राहिले
अपघातग्रस्त स्कॉर्पिओतील काही तरुण हे वैद्यकीय शिक्षण घेत होते तर काही जण पोलीस भरतीसाठी तयारी करणारे होते. मात्र या भीषण अपघाताने या मुलांचे डॉक्टर, पोलीस होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. दरम्यान मृत तरुणांच्या पालकांनी घटनास्थळी धाव घेऊन हंबरडा फोडल्याने दाभीळ गाव जंगल परिसरही अक्षरश: हादरून गेला.
2018 च्या महाभयंकर बस दुर्घटनेची आठवण ताजी
ज्या परिसरात हा अपघात घडला आहे त्याच ठिकाणी 2018 मध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत 30 पेक्षा जास्त कर्मचाऱयांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा त्याच परिसरात हा स्कॉर्पिओ जीपचा अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
50 कॉल केले, पण मुलाने फोन उचललाच नाही
अपघातग्रस्त स्कॉर्पिओ रविवारी नाही तर शनिवारी रात्री साताराच्या दिशेने निघाल्याचे मृत रितेश लोखंडे याच्या वडिलांनी सांगितले. शनिवारी दिवसभर समुद्रावर मौजमजा केल्याचे फोटोदेखील मुलांनी स्टेट्सवर ठेवले होते. रविवारी रात्री ते स्कॉर्पिओ गाडीने परतीच्या प्रवासाला निघाले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर त्यांनी हा घाट चढायला सुरुवात केली; मात्र रात्री 3 वाजल्यापासून या सर्वांचे मोबाईल फोटो ‘नॉट रिचेबल’ झाले. रितेशच्या वडिलांनी दिवसभरात त्याला 50 ते 60 कॉल केले. परंतु त्याने फोन उचललाच नाही. आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला. रविवारी रात्री 9 च्या सुमारास पोलिसांना आंबेनळी घाटातील दरीच्या परिसरात एका मोबाईलचे लोकेशन मिळाले. त्यानंतर यंत्रणेला या भीषण अपघाताची माहिती मिळाली.
मृतांची नावे
- महेश पवार (25)
- आदित्य साळुंखे (21)
- रितेश लोखंडे (25)
- सुहास लोखंडे (20)
- अंश चव्हाण (18)
- उत्कर्ष शिंगटे (21)
- अनिल शिंगटे (25)
- नितीन नायकोंडे (35)


































































