
सामना प्रतिनिधी । कुडाळ
सेंटर फॉर एक्सलन्सच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑल इंडिया गणित, विज्ञान टॅलेंट परिक्षेत कुडाळ-एमआयडीसी येथील बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूलच्या कु. अथर्व गुरूनाथ धुरी (इयत्ता चौथी) या विद्यार्थ्यांने राष्ट्रीय स्तरावर पाचवा क्रमांक मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले.
कु.अथर्व हा वेतोरे (ता.वेंगुर्ले) येथील असून तो कुडाळ येथील बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये चौथी इयत्तेत शिक्षण घेत आहे. अलिकडेच घेण्यात आलेल्या ऑल इंडिया गणित, विज्ञान टॅलेंट परिक्षेत त्याने राष्ट्रीय स्तरावर पाचवा क्रमांक मिळवत दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकाविले आहे. इयत्ता तिसरीत असताना सायन्स ऑलिंपियाड फाऊंडेशनच्या गणित ऑलिंपियाड परिक्षेत त्याने रौप्य पदक मिळविले होते. शिवाय सन २०१५ – १६ मध्ये आठव्या ऑल इंडिया मॅथ्स्, सायन्स टॅलेंट परिक्षेत अथर्वने प्रथम श्रेणीत येऊन संपूर्ण देशात चौथा क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदक प्राप्त केले होते. अथर्वला सेंट्रल स्कूलच्या शिक्षकांसह आई – वडिलांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर व स्कूलच्या प्राचार्या स्वरा गावडे यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





























































