बीआरएस भाजपची बी टीम; दोघांमध्ये छुपा करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून दोन्ही पक्षांत छुपा करार झाला आहे. या दोन्ही पक्षांना ज्यातून फायदा मिळेल तीच कामे करतात, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. संगारेड्डी येथील सभोला संबोधित करताना त्यांनी भाजप आणि बीआरएस सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना जे हवे आहे ते त्यांनी केले, परंतु त्यात कुणाचा फायदा झाला, असा सवाल खरगे यांनी केला. महिला आणि शेतकऱयांना काही फायदा झाला का, असा सवाल करतानाच काँग्रेसची सत्ता आल्यास सहा आश्वासने देऊ असेही ते म्हणाले. काँग्रेस जी आश्वासने देते ती पूर्ण करते, परंतु भाजप आणि बीआरएस मते मागण्यासाठी येतात आणि पुन्हा निघुन जातात असा आरोपही त्यांनी केला. दोन्ही पक्ष काँग्रेसला 70 वर्षांत काय केले असा सवाल करत आहेत. त्यामुळे त्यांची मिलीभगत असल्याचा टोलाही खरगे यांनी लगावला. दरम्यान, काँग्रेसने नेहमीच गरीब, विद्यार्थी, शेतकरी, महिला, मागासवर्गीय, आदिवासी यांच्या अधिकारांसाठी लढा दिला, असेही खरगे म्हणाले.