गुप्तधनाच्या नावाखाली एकाला गंडवले , वसईमधून दोघा आरोपींना केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरात सापडलेले गुप्तधन स्वस्तात विकायचे असल्याचे सांगून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मशराम परमार आणि जगदीश साकला यांना  क्राइम ब्रँच युनिट 12 ने बेडय़ा ठोकल्या.  तक्रारदाराचे मालाड येथे झेरॉक्सचे दुकान आहे. जुलै महिन्यात मशराम आणि जगदीश हे त्याच्या दुकानात आले. त्यांनी आपल्याकडे गुप्तधन असून ते  स्वस्तात विकायचे असल्याचे सांगून एक सोन्याचा तुकडा व्यावसायिकांना दाखवला. व्यावसायिकांनी ते सोने ज्वेलर्सला दाखवले असता ते खरे निघाले. त्यानंतर त्या दोघांनी व्यावसायिकांना पैसे घेऊन मालाड पूर्व परिसरात बोलावले. मशराम आणि जगदीश यांनी खोटे सोने देऊन व्यावसायिकाकडून 4 लाख 60 हजार रुपये घेतले.

व्यावसायिकाने ते सोने ज्वेलर्सला दाखवले. तेव्हा ते सोने खोटे असल्याचे व्यावसायिकांना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यावसायिकाने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुरार पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. याचा तपास युनिट 12 करत होते. प्रभारी पोलीस निरीक्षक विलास भोसले, सहायक निरीक्षक रासकर, लिम्हणा, कल्पेश सावंत आदी पथकाने तपास सुरू केला. ते दोघे वसई परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतले.ते दोघे फसवणूक करण्यासाठी राजस्थान येथून मुंबईत यायचे.