हिंदुस्थानी परदेशात किती सुरक्षित?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अमोल शरद दीक्षित 

हिंदुस्थानींना  परदेशाचे आकर्षण नेहमीच राहिलेले आहे. शिक्षण किंवा नोकरीनिमित्त आज अनेक हिंदुस्थानी नागरिक जगातील विविध देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. पण आजवर अनेक हिंदुस्थानी विद्यार्थी व नागरिकांना वर्णभेदावरून झालेल्या हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. मूळच्या मुंबईतील डोंबिवलीचे असणारे मयूर कार्लेकर हे इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच वर्णभेदाच्या कारणावरून काही अज्ञातांनी कार्लेकर यांचे घर पेटविले. शेजार्‍यांनी आरडाओरड केल्याने कार्लेकर हे स्वतः, त्यांची पत्नी व त्यांची दोन मुले सुदैवाने बचावली. पण या घटनेनंतर परदेशात राहणार्‍या हिंदुस्थानींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

यापूर्वी मूळचा पुण्यातील पण लंडनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या अनुज बिडवे या 23 वर्षीय मुलाची 26 डिसेंबर 2011 रोजी तेथील एका स्थानिक कंपनीमधील कामगाराने हत्या केली. या घटनेनंतर अनुजचा मृतदेह पुण्यातील त्याच्या घरी पोहोचेपर्यंत तसेच त्याच्या हल्लेखोरास सहा महिन्यांतच शिक्षा होईपर्यंत ब्रिटिश पोलिसांनी मोठे सहकार्य केले. पण त्याच्या हत्येचे नेमके कारण ब्रिटिश पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले नाही. विशेष म्हणजे अनुजला परदेशी शिक्षणासाठी त्याच्या वडिलांनी शैक्षणिक कर्ज काढून त्यास इंग्लंडमध्ये पाठविले होते, या गोष्टीचा याठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. 28 जून 2010 रोजी एका हिंदुस्थानी संगणकीय शास्त्रज्ञावर तीन बालगुन्हेगारांनी हल्ला केला होता. ऑक्टोबर 2016 मध्ये ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन येथे हिंदुस्थानी वंशाच्या असणार्‍या बसचालक मनमित आशर यांच्यावर चालत्या बसमध्ये ऑस्ट्रेलियन माथेफिरू नागरिकाने ज्वलनशील पदार्थ फेकून त्यास जिवंत जाळले. ब्रिस्बेनमधील पंजाबी समुदायात मनमित यांची पंजाबी गायक म्हणूनही ओळख होती.

हैदराबादमधील श्रीनिवास कुचीभोतला व त्याचा मित्र अलोक मदसानी हे दोघे हिंदुस्थानी अभियंते नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक होते. 22 फेब्रुवारी 2017 रोजी अमेरिकन नेव्हीमधून निवृत्त झालेल्या 51 वर्षीय ऍडम पुरींतन याने ‘तुम्ही आतंकवादी आहात, माझ्या देशातून निघून जा, माझ्या देशात तुम्ही का आला आहात? तुम्ही आमच्यापेक्षा हुशार कसे असू शकता?’ असा प्रश्नांचा भडिमार करीत त्या दोघांवर गोळीबार केला. इंग्लंडमध्ये एका ब्रिटिश नागरिकाने बुरखाधारी महिलेवर टीकाटिपणी केली. या गोष्टीचा मूळ हिंदुस्थानी वंशाच्या असणार्‍या इंग्लंडस्थित 28 वर्षीय रिकेश अडवाणी याने विरोध केला, त्यानंतर त्या ब्रिटिश नागरिकाने रिकेशवर ‘ब्रेग्झिट, गो बॅक होम ’ असे म्हणत हल्ला चढविला. असे किती हल्ले हिंदुस्थानी मूळ वंशाच्या व परदेशात शिक्षण घेणार्‍या व नोकरीनिमित्त स्थायिक असणार्‍या हिंदुस्थानींनी सहन करायचे आहेत?

दक्षिण आफ्रिकेचे दिवंगत अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी आयुष्यभर वर्णभेदाच्या विरोधात लढा दिला. यासाठी त्यांनी 27 वर्षे तुरुंगात घालविली. पण आजही अमेरिका, इंग्लंड व युरोप खंडातील इतर राष्ट्रांत तसेच जगातील अनेक इतर भागांत असे वर्णभेदावरून हल्ले होत असतील तर मंडेला व याविरोधात आयुष्यभर झगडणार्‍यांचा लढा व्यर्थ मानावा का? हा खरा प्रश्न आहे. अमेरिका व ऑस्ट्रेलियाबरोबर युरोप खंडातील राष्ट्रे आपण खूप पुढारलेली आहेत असे म्हणतो. तरी आजही त्याठिकाणी आपणांस वर्णभेदाची वागणूक पाहायला मिळते. वास्तविक हिंदुस्थानींच्याच बुद्धिमत्तेच्या जोरावर जगातील ही भांडवलशाही व विकसित राष्ट्रे आणखी प्रगत होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुलगा किंवा मुलीने परदेशात शिक्षण घेणे अथवा परदेशात चांगल्या हुद्यावर नोकरी करणे ही हिंदुस्थानी पालकांसाठी प्रतिष्ठेची बाब बनली आहे. पण परदेशातील हिंदुस्थानींवर वर्णभेदातून होणार्‍या हल्ल्यामुळे हाच पालक आज चिंतेत आहे. हिंदुस्थानींच्या सुरक्षेची हमी परदेशातील सरकारने दिली तरी ज्या माथेफिरू परदेशी नागरिकांच्या डोक्यात, मेंदूत व मनात वर्णभेदाची मानसिकता खोलवर रुजलेली आहे त्यांना कसे आवरणार?