…तेव्हा द्रविडने धोनीला फटकारले होते, सेहवागने सांगितला पाकिस्तान दौऱ्यातील ‘तो’ किस्सा

टीम इंडियाचा माजी खेळाडू राहुल द्रविड (Rahul Dravid) मैदानातील आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. विरोधी संघाच्या खेळाडूंनी त्याला कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी तोंडाऐवजी तो आपल्या बॅटने उत्तर देण्यास भले मानत होता. द्रविडला मैदानात राडा घालताना किंवा रागाराग करताना शक्यतो कोणी पाहिले नाही. मात्र माजी सलामीवीर खेळाडू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)याने द्रविडलाही राग येतो, असे म्हणत एक किस्सा सांगितला आहे. त्यावेळी द्रविडने महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याला फटकारले होते, असेही विरूने सांगितले.

हिंदूस्थानचा संघ 2006 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यामध्ये एमएस धोनीने एक चुकीचा फटका मारला होता. यामुळे द्रविड त्याच्यावर नाराज झाला होता आणि भर मैदानात त्याने धोनीला फटकारले होते, असे सेहवागने सांगितले. ‘क्रिकबज’शी बोलताना सेहवागने हा किस्सा सांगितला आहे.

सेहवाग म्हणाला की, मी राहुल द्रविडला नाराज होताना पाहिले आहे. आम्ही पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलो होतो आणि धोनी नवीनच संघात आला होता. त्याने एक चुकीचा फटका मारला आणि पॉइंटवर झेलबाद झाला. त्यामुळे द्रविड खूपच नाराज झाला होता. त्याने धोनीला चांगलेच सुनावले होते.

अशाप्रकारे फटका मारतात का? तुला तुझी कारकीर्द संपवायची आहे का? असे शब्द राहुल द्रविडने धोनीला उद्देशून वापरले होते. द्रविडने ज्या पद्धतीने इंग्रजीतून धोनीला फटकारले ते पाहून आम्ही हैराण झालो. यानंतर मैदानात उतरलेल्या धोनीने जपून फलंदाजी केली. याबाबत मी त्याला विचारले असता त्याने पुन्हा द्रविडकडून ऐकून घ्यायचे नाहीय, असे उत्तर दिल्याचे सेहवागने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या