बीड जिल्ह्यात सिझरची संख्या घटली, खासगी रूग्णालयातील लुटही थांबली 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनीधी । बीड

योग्य ठिकाणी, योग्य व्यक्ती कार्यरत असेल तर सामान्य जनतेला न्याय मिळतो हे दाखवून दिले आहे. बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी उठसुठ प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयाकडे पाठवून देण्याचा पॅटर्न बंद करत बीड जिल्ह्यातील पाच शासकीय रूग्णालयांनी महिनाभरात ५०० प्रसुती केल्या. प्रसुतींची सरासरी पाचपट वाढली. तर सिझरची सरासरी पाच पटीने कमी झाली. याचे सर्व श्रेय डॉ.अशोक थोरात यांना जाते. त्यांच्या या परिश्रमामुळे बीड शहरातील खासगी रूग्णालयात सिझरच्या नावाखाली रूग्णांची होणारी लुट थांबली आहे.

बीड जिल्ह्यात शासकीय रूग्णालयाचा कारभार म्हणजे राम भरोसेच सुरू होता. प्राथमिक आणि ग्रामीण रूग्णालयातून सामान्य रूग्णांनाही बीडच्या जिल्हा रूग्णालयाकडे जाण्यास सुचवले जायचे आणि बीडच्या जिल्हा रूग्णालयातून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ किंवा संभाजीनगरच्या घाटीकडे पाठवले जायचे. यात रूग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होऊन जायची. मात्र काही महिन्यापूर्वी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक पदावर डॉ. अशोक थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आणि ग्रामीण व जिल्हा रूग्णालयाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले. अहोरात्र परिश्रम घेत डॉ.थोरात यांनी रूग्णसेवा तत्पर केली. शिस्त लावली. याचाच परिपाक आता दिसून येऊ लागला आहे. ज्या स्त्रीरोग आणि ग्रामीण रूग्णालयात महिनाभरात कसेबसे १५-२० प्रसुती केल्या जायच्या त्या ठिकाणी आता महिन्याला १०० प्रसुती केल्या जात आहेत. अत्यंत गंभीर परिस्थितीतच रूग्ण दुसर्‍या इस्पितळात दाखल केले जात आहेत. तसेच सिझरची संख्याही पाच पटीने कमी झाली आहे. केज, परळी, माजलगाव आणि गेवराई या चार ग्रामीण रूग्णालयात महिन्याला १०० हून अधिक प्रसुती झाल्या आहेत. त्यानंतर नेकनूरसारख्या ग्रामीण भागातील स्त्री रूग्णालयातही कारभार दर्जेदार झाला झाला आहे. ऑगस्टमध्ये नेकनूर स्त्री रूग्णालयामध्ये १०० प्रसुती झाल्या आणि २१ सिझर करण्यात आले. यात चार मोठ्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. काल नेकनूरमध्ये १०० वी प्रसुती होत असताना दस्तुरखुद्द जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात सपत्नीक उपस्थित होते. रात्री दहा वाजता ही १०० वी प्रसुती केल्यानंतर ग्रामस्थांनीही डॉ. थोरात यांचा सत्कार केला. साहजिकच यासाठी डॉ. सुधीर राऊत, डॉ.आंधळकर यांचे परिश्रम महत्वाचे ठरले.