
ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कणकवली-मालवणचे माजी आमदार डॉ. यशवंतराव बाबाजी दळवी तथा य. बा. यांचे आज वृद्धापकाळाने मुंबईतील निवासस्थानी दुःखद निधन झाले. त्यांनी फेब्रुवारी महिन्यातच शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. श्रीमती साधना, मुलगा रणजीत तसेच कन्या कल्पना कदम, दीया मोरे, सुप्रिया सुलचंदानी तसेच नातवंडे-पतवंडे असा परिवार आहे.
1953 मध्ये वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डॉ. य. बा दळवी यांनी मुंबईत न राहता थेट कोकणातील आपले गाव कळसुली गाठले आणि रुग्णसेवा सुरू केली. रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेळकाळ न पाहता रात्री-अपरात्रीही मैलोनमैल दूर जाऊन त्यांनी सेवा दिली होती. त्यामुळे कणकवली तालुक्यात ‘आमचे डॉक्टर’ या नावाने परिचित होते.
डॉ. दळवी यांनी 1962 मध्ये कणकवली आणि 1978 मध्ये मालवण मतदारसंघातून अनुक्रमे प्रजा समाजवादी पक्ष आणि जनता दलाच्या तिकिटावरून ते विधानसभेवर निवडून आले होते. बॅरिस्टर नाथ पै आणि केंद्रीय मंत्री प्रा. मधु दंडवते यांचे ते विश्वासू सहकारी होते. गावातील हायस्कूल आणि रस्त्यांसाठी त्यांनी स्वतःची जमीन दिली होती.