… तर पाकिस्तानमध्ये फुटा, स्वतंत्र पंतप्रधान मागणाऱ्या ओमर अब्दुल्लांवर गंभीरचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला टीम इंडियाचा माजी क्रिकेट खेळाडू गौतम गंभीर आणि जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्यात ट्विटरवर खडाजंगी सुरू झाली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी स्वतंत्र पंतप्रधान, राष्ट्रपत्री आणि संविधान असणारे कश्मीर पुन्हा बनवू असे वक्तव्य केल्यानंतर गंभीरने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवत पाकिस्तानमध्ये चालते होण्यास सांगितले होते. या ट्वीटला आता अब्दुल्ला यांनीही प्रत्युत्तर देत राजकारणाऐवजी आयपीएलसंबंधी ट्वीट करण्याचा सल्ला गंभीरला दिला आहे.

स्वतंत्र पंतप्रधान, राष्ट्रपती असलेला कश्मीर पुन्हा बनवू, ओमर अब्दुल्ला बरळले

सोमवारी कश्मीरमध्ये निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना ओमर अब्दुल्ला यांनी पूर्वीप्रमाणे आपले स्वतंत्र पंतप्रधान, राष्ट्रपत्री आणि संविधान असणारे राज्य आपण पुन्हा आणू असे बेताल वक्तव्य केले होते. अब्दुल्ला यांचा देश तोडण्याच्या भाषेचा देशभरातून निषेध करण्यात आला होता. अब्दुल्लांच्या वक्तव्याचा निषेध करतान गौतम गंभीरने आक्रमक ट्वीट केले होते.

‘ओमर अब्दुल्ला यांना जम्मू-कश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान हवा आहे आणि मला समुद्रावर चालायचे आहे, ओमर अब्दुल्ला यांना पंतप्रधान हवा आहे आणि मला डुक्कराला उडताना पाहायचे आहे’, असे उपहासात्मक ट्वीट गंभीरने केले होते. तसेच, ‘ओमर अब्दुल्ला यांना स्वतंत्र पंतप्रधानांचा विचार करण्याचाऐवजी कॉफी पिऊन झोप घेण्याची आवश्यकता आहे. जर तरीही त्यांना काही समजले नाही तर त्यांना पाकिस्तानी पासपोर्टची आवश्यकता आहे’, असे नमूद करत एकप्रकारे पाकिस्तानमध्ये फूटण्याचा सल्ला दिला.

गंभीरचा सल्ला झोंबलेल्या ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत याला प्रत्युत्तर दिले आहे. ‘गौतम, मी जास्त क्रिकेट खेळलेलो नाही, कारण मला माहिती आहे मी या खेळामध्ये परिपूर्ण नाही. तुला जम्मू-कश्मीर, त्याचा इतिहास व जम्मू-कश्मीरचा इतिहास लिहिण्यामागील नॅशनल कॉन्फरन्सची भूमिकेबाबत माहिती नाही. तुला ज्याबाबत माहिती आहे त्यासंबंधी बोल. तू आयपीएलसंबंधी ट्वीट करायला हवे’, असे ट्वीट ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.

दरम्यान, गौतम गंभीर आता ओमर अब्दुल्ला यांच्या ट्वीटला काय उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. गंभीरने गेल्याच महिन्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. गंभीरला दिल्लीतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.