करीअरची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेचे 750 हून अधिक भाग आता पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने स्वामी समर्थांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते अक्षय मुडावदकर यांनी आपला प्रवास सांगितला.

  • मालिकेच्या प्रवासाबद्दल सांगा ?

अडीच वर्षांचा प्रवास, अगणित अनुभव, मोठयांचे आशीर्वाद, लहानंच प्रेम…आणि स्वामी आजोबा म्हणून येणारी हाक… कधी स्वप्नातसुद्धा विचार नव्हता केला की, आपल्या वाटय़ाला हे सगळं येईल. खरं तर यापैकी फक्त 1-2  गोष्टी जरी एक कलाकार म्हणून मिळाल्या असत्या तरी मी खूश असतो. मात्र आज स्वामीकृपेने इतपं मिळालंय की, हे लिहतानासुद्धा आनंदाश्रू अनावर होतात.  प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक भेटतील मनापासून प्रेम दाखवतात. खरं तर हे सगळं स्वामींकरता आहे हे मी जाणतो.

  • स्वामींच्या भूमिकेने काय शिकवले ?

खूप काही शिकलो मी या प्रवासात आणि एक माणूस म्हणून स्वतःला बदलण्याची एक संधी शोधू लागलो. माणूस म्हणून आपण कुठे चुकतोय हे परीक्षण करू लागलो आणि त्या गोष्टींवर मात करून सुधारण्याचा प्रयत्न करू लागलो.

  • पहिली मालिका आणि स्वामी साकारायला मिळणं… काय सांगाल?

एक कलाकार म्हणून जे जे हवं असतं ते सगळं स्वामींनी मला दिलंय. ओळख, प्रसिद्धी, मान आणि महत्त्वाचं म्हणजे काम करण्याचे समाधान. आज माझ्या करीअरची सुरुवात साक्षात स्वामींच्या भूमिकेने व्हावी हा खरंतर मी माझ्या पुढील प्रवासाकरिता मिळालेला स्वामींचा आशीर्वाद समजतो.