सिरमची लस हिंदुस्थानात टोचणार, आपत्कालीन वापरासाठी परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसच्या तणावाखालील असलेल्या नागरिकांसाठी नववर्षाच्या सुरुवातीलाच दिलासादायक बातमी आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात फायझरच्या लसीला परवानगी मिळत असतानाच केंद्र सरकारने आज  पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटमध्ये उत्पादन होत असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोव्हिशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेच्या (सीडीएसओ) तज्ञांची शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत फायझर, भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिटय़ूट या तिन्ही कंपन्यांनी आपले प्रेझेंटेशन दिले. तज्ञांनी सिरम इन्स्टीटय़ुटमध्ये निर्मिती होत असलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्याचे वृत्त आहे. यापूर्वी तज्ञ समितीच्या दोन बैठका झाल्या होत्या. लस निर्मिती करणाऱ्य़ा कंपन्यांकडून माहिती मागविण्यात आली होती.

जगातील सर्वात मोठी लस निर्माण करणारी कंपनी

पुण्यातील सिरम इन्स्टीटय़ुट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लसनिर्मिती करणारी कंपनी आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी कोविशिल्ड लस निर्माण केली. ऍस्ट्राझिन्काने त्याचे उत्पादन सुरू केले. ‘सिरम’ने ऑक्सफर्डबरोबर लस निर्मितीचा करार केला. कोविशिल्ड लसीच्या देशात तीनवेळा मानवी चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

कोटय़वधी डोस तयार

सिरमकडे कोविशिल्डचे कोटय़वधी डोस तयार आहेत. त्यामुळे आपत्कालीन वापरानंतर देशात प्रत्यक्षात लसीकरणाला लवकरच सुरुवात होईल अशी शक्यता आहे.

आज ‘ड्राय रन’

प्रत्यक्ष लसीकरणापूर्वीची रंगीत तालीम अर्थात ‘ड्राय रन’ आज  देशभरात राबविले जाणार आहे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार येथे हे ‘ड्राय रन’ होणार आहे.