मालक परदेशात; नोकराने केले घर साफ! माटुंगा पोलिसांनी यूपीत जाऊन आरोपीला पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादरच्या पारसी कॉलनीत राहणारे मेहता कुटुंबासह परदेशात गेले होते. ही माहिती मिळताच दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे घरकाम करणाऱया तरुणाने यूपीहून मुंबई गाठली आणि घर साफ करून पोबारा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच माटुंगा पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून त्या नोकराला यूपीत जाऊन पकडले.

दादर पूर्वेकडील पारसी कॉलनीत असलेल्या ब्लिस अपार्टमेंटमध्ये अक्षय मेहता हे राहतात. मे महिन्यात ते कुटुंबासमवेत परदेशात गेले होते. दरम्यान, सूरज सिंग (24) हा तरुण त्यांच्याकडे आधी कामाला होता, पण दोन वर्षांपूर्वी त्याने काम सोडले होते. मेहता परदेशात गेल्याचे कळताच सूरजने यूपीहून थेट मुंबई गाठली. तो इमारतीत गेला आणि बनावट चावीने बंद घराचे कुलूप उघडले. तत्पूर्वी त्याने घरातले सीसीटीव्ही बंद केले. मग घरातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन तो पसार झाला.

मेहता हे मुंबईत परतल्यावर हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी माटुंगा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी लगेच घरफोडीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद पाटील व पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान यूपीत राहणारा सूरज घटनेच्या दिवशी मुंबईत होता असे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी सूरजचे यूपीतील बस्ती गाव गाठून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत सूरजने गुह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येते.