
राजेश देशमाने । बुलढाणा
पळसखेड सपकाळ या गावातील नंदकुमार पालवे व आरती पालवे या नवदाम्पत्याने सेवा संकल्पाच्या माध्यमातून मानवतेचे मंदिर उभारले असून या प्रकल्पामध्ये आज ५२ बेवारस मनोरुग्णांना आधार मिळाला आहे.
पळसखेड सपकाळ येथील नंदकुमार पालवे चिखली येथे बीएससी शिक्षणासाठी यायचा. दररोज जाणे-येणे करताना नंदकुमार पालवे यांना चिखली बसस्थानकावर माऊली हा केसांचा जटा वाढलेला व कुत्रा, डुक्करांसोबत एकाच ताटात जेवतांना मनोरुग्ण आढळला आणि त्याचे मन हेलावून गेले. या बेसहारा अनाथ मनोरुग्णांसाठी काहीतरी करायचे ही भावना मनात आली. डॉ. प्रकाश आमटे, मंदाताई आमटे यांचे कार्य वाचण्यात व पाहण्यात होते आणि त्याने ठरवले की, पुढील आयुष्य या लोकांसाठी खर्ची घालायचे. दरम्यान, २०११ला आरती सोबत पालवे याचे लग्न झाले. आरतीचे शिक्षण बीएससी, बीएड आहे. प्रथम या जोडप्याने रस्त्यावर बेसहारा असलेल्या मनोरुग्ण वृद्धांना दोन वेळेचे जेवण सुरू केले. त्यानंतर त्यांना चिखली येथे नारायण भोलवनकर, सागर जाधव, बुलढाणा येथे निशिकांत ढवळे, अक्षय दुबे, कांता माटोले यांचे सहकार्य लाभले.
दररोज ही मंडळी चिखली बुलढाणा शहरातील बेसहारा रस्त्यावरील ७० लोकांना दोन वेळचे जेवण देवू लागले. त्याच बरोबर आठ दिवसांतून या बेसहारा लोकांची दाढी कटींग, मेडीकल, वैयक्तीक स्वच्छता करुन देत होते. त्यावेळी या पालवे दाम्पत्याच्या मनात विचार आला की, आपण यांना सगळेच देतो पण त्यांच्या डोक्यावर छत नाही. ते छतही त्याना मिळावे या करीता ‘सेवा संकल्प’ हा प्रकल्प सुरु करण्याचे त्याने ठरविले. दानशूर सहकारी नंदकुमार पालवे यांनी पळसखेड सपकाळ येथील दीड एकर जमीन या प्रकल्पासाठी दिली व त्या जमिनीवर ७ ऑक्टोबर २०१२ पासून डॉ. प्रकाश आमटे, मंताताई आमटे यांचे हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होवून हा सेवासंकल्प सुरु झाला.
आज या प्रकल्पात ५२ बेसहारा मनोरुग्ण असून त्यापैकी २१ महिला आहे व त्यांची तीन लहान मुले आहेत. अनेक मनोरुग्णांना आपण काय करतो याचे सुद्धा भान राहत नाही. या बेसहारा बेवारस लोकांची दररोज स्वच्छता करणे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे. भोजन देणे हे काम हे पालवे दाम्पत्य करत आहे. आजपर्यंत या सेवा प्रकल्पाला मातृतीर्थ प्रतिष्ठान, लोकजागर परिवार, सिंदखेडराजा, योगीराज फाऊंडेशन व हभप संजय महाराज पाचपोर यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. यासह अन्य दाते जन्मदिन, स्मृतीदिनी मदत करतात. कोणी वस्तुरुपात, धान्यरुपात तर कोणी रोख मदत करते. हा ५२ लोकांचा परिवार चालवितांना ‘सेवा संकल्प’वर तिन लाखांचे कर्ज झाले आहे. त्यांना खर्या अर्थाने मदतीची अपेक्षा आहे. या सेवा संकल्प परिवाराला डॉ. भागवत राजपूत, डॉ. विश्वास खर्चे, डॉ. स्वप्नील करवंदे हे मानसोपचार तज्ञ तर डॉ. सुहास खेडेकर, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. जवंजाळ, डॉ. मेहेन्द्रे, डॉ. शिवशंकर खेडेकर यांचे मोफत औषध उपचारासह सहकार्य लाभत आहे.
पालवे दाम्पत्य आपल्या आयुष्याचा संपूर्ण वेळ या मनोरुग्णांच्या सेवेत देत आहे. आजपर्यंत १३ बेवारस मनोरुग्णांना बरे करुन त्यांना त्यांच्या घरी परिवारात पोहचवले आहे. हे उच्चशिक्षित पालवे दाम्पत्य आपल्या सुखी संसारात न रमता संपूर्ण वेळ या मनोरुग्णांच्या सेवेत देत आहे. खर्या अर्थाने त्यांना हा सेवासंकल्प प्रकल्प चालविण्यास मदतीची आवश्यकता आहे. तेव्हा दिवाळीत फटाक्यासह अन्य गोष्टीवर वायफळ खर्च करणार्यांनी नंदकुमार पालवे यांना ९४०४९९१९२७ या क्रमांकावर फोन करुन आपल्या मदतीचा हातभार लावण्याची आवश्यकता आहे.




























































