पाकिस्तानात पोलीस प्रशिक्षण केंद्रावर मोठा दहशतवादी हल्ला, 6 तास चालला गोळीबार

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील रट्टा कुलाची भागात एका पोलीस प्रशिक्षण केंद्रावर शुक्रवारी रात्री मोठा दहशतवादी हल्ला झाला. सुमारे ७ ते ८ दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, या हल्ल्यात ७ पोलिसांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या ट्रकचा वापर करून मुख्य दरवाज्यावर धडक दिली, ज्यामुळे स्फोट झाला आणि नंतर सुमारे ६ तास गोळीबार चालला. पोलिसांनी प्रत्युत्तर देत ६ दहशतवाद्यांना ठार मारले.

हल्ला डेरा इस्माइल खान शहराच्या परिसरातील रट्टा कुलाची भागातील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर झाला, जो दक्षिण वझिरिस्तानच्या सीमेजवळ आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वेशात केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला आणि ऑटोमॅटिक शस्त्रांमधून गोळीबार सुरू केला. याशिवाय त्यांनी हातग्रेनेडही फेकले. हल्लेखोरांकडे स्फोटक, शस्त्रे आणि भरपूर गोळ्यांचा साठा होता.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेषतः अफगाणिस्तान सीमेजवळील खैबर पख्तूनख्वा प्रांतात. पाकिस्तान आर्मीचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, २०२१ पासून दहशतवादी हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.