नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण, राष्ट्रीय आरोग्य मोहिमेतील अधिकाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंड राज्यातील सिमडेगा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी राजीव कुमार याने नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. याप्रकरणी राजीव कुमार यास सिमडेगा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजीव राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा प्रबंधक ह्या पदावर कार्यरत आहे. राजीव कुमार हा नोकरी देण्याचे अमिश दाखवून महिलांना घरी बोलवायचा, आणि महिलांचे लैंगिक शोषण करून व्हिडीओ बनवायचा, तसेच व्हिडीओच्या आधारे महिलांना ब्लॅकमेल करायचा.

राजीवने अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल सिमडेगाचे पोलीस अधिक्षक शम्स तबरेज यांनी सांगितले की, राजीव कुमार राष्ट्रीय आरोग्य मोहिमेत जिल्हा स्तरावर प्रबंधक ह्या पदावर कार्यरत आहेत. राजीव महिलांना नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून, महिलांना घरी बोलवत होता. महिलांचे लैंगिक शोषण करून, त्याचे व्हि़डीओ बनवायचा आणि ब्लॅकमेल करत होता. त्याने अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

पोलीस अधिक्षक शम्स तरबेज हिंदी वृत्तवाहिनी आजतकशी बोलताना म्हणाले की, ह्या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात राजीव कुमारच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तसेच पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यास सुरवात केली आहे. राजीवला पोलीस आपला शोध घेत आहेत, हे समजले तेव्हा त्याने पळ काढला. राजीवला काल रात्री उशिरा कोलेबिरा येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपी राजीवची कसून चौकशी केली. तपासात पोलिसांना अनेक नव्या गोष्टींचा खुलासा झाला. आरोपी राजीव याच्यावर साहेबगंज पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी आरोपी राजीवकडून एक लॅपटॉप, सीडी, पेनड्राइव्ह आणि काही मोबाइल असे साहित्य जप्त केले आहे.