मुंबईसह कोकणाला ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता, IMD चा इशारा

मराठवाडा, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडवून दिला. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले, घरे-जनावरे वाहून गेली. यामुळे शेतकरी संकटात असतानाच आता आणखी एक संकट घोंघावत आहे. हवामान विभागाने मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.

आयएमडी ट्रॉपिकल सायक्लोन ॲडव्हायजरी क्र. ०३ ने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार ‘शक्ती’ चक्रीवादळाचा राज्यातील काही जिल्ह्यांना ३ ते ७ ऑक्टोबर, २०२५ दरम्यान इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगच्या जिल्ह्यांना हे वादळ प्रभावित करु शकते. या दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे सूचित करण्यात आले आहे.

वेगवान वारे वाहणार

३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर आणि जवळपास ४५-५५ किमी/तास वेगाचे वारे, झंझावाती वेगाने ६५ किमी/तास पर्यंत जाण्याची शक्यता. वाऱ्याचा वेग चक्रीवादळच्या तीव्रतेनुसार वाढू शकतो.

मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे

५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र किनारप‌ट्टीवर अतिशय खवळलेला समुद्र अपेक्षित आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असा स्पष्ट इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

अति मुसळधार पावसाची शक्यता

शक्ती वादळामुळे मुंबई, कोकणासह महाराष्ट्रातील अंतर्गत भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यत आहे. विशेषतः पूर्व विदर्भ, मराठवाड्‌याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणातील सखल भागांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय कराव्यात, किनारपट्टी व सखल भागांतील नागरिकांसाठी स्थलांतर योजना तयार ठेवाव्यात आणि समुद्र प्रवास टाळावा सार्वजनिक सूचना जारी कराव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत.