
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नवर रविवारी त्याचे कुटुंबीय आणि मित्रांनी खासगी अंत्यसंस्कार करत या क्रिकेटपटूला अखेरचा निरोप दिला. यावेळी वॉर्नचे आई-वडील किथ आणि ब्रिजिट यांच्यासह जॅक्सन, ब्रुक आणि समर ही तिन्ही मुले उपस्थित होती. प्रमुख 80 पाहुण्यांच्या साक्षीने हा अंत्यविधी पार पडला.
शेन वॉर्नचा जिवलग मित्र एडी मॅग्वायर याने त्याचे स्तवन (यूलॉजी) वाचले. अंत्यसंस्काराच्या वेळी तो मास्टर ऑफ सेरेमनीदेखील होता. मुराबिनमध्ये हा अंत्यसंस्कार विधी पार पडला. अंत्यसंस्कारासाठी आमंत्रित पाहुण्यांना सेंट किल्डा स्कार्फ परिधान करण्यास सांगितले होते. तसेच ते वॉर्नच्या शवपेटीवरही गुंडाळले गेले होते. शेन वॉर्न सेंट किल्डा फुटबॉल क्लबशीदेखील संबंधित होता. वॉर्नची शवपेटी नेत असताना 1970च्या बिल मेडले आणि जेनिफर वॉर्न्स यांचे हिट गाणे ‘द टाइम ऑफ माय लाइफ’ हे वाजविण्यात आले. शेन वॉर्नचा मुलगा जॅक्सनने वडिलांच्या शवपेटीजवळ गोल्फची स्टीक व क्रिकेटचा बॉल ठेवला. 52 वर्षीय शेन वॉर्न काही दिवसांपूर्वी मित्रांसोबत थायलंडला सुट्टी घालविण्यासाठी गेला होता. तेथेच 4 मार्च रोजी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे थायलंडमध्येच निधन झाले. 10 मार्चला थायलंडहून त्याचे पार्थिव विमानाने ऑस्ट्रेलियात आणण्यात आले होते.
दिग्गज क्रिकेटपटूंची हजेरी
महान गोलंदाज शेन वॉर्नच्या अंत्ययात्रेला क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर, अॅलन बॉर्डर, मायकेल क्लार्क, अॅण्ड्रय़ू सायमंड्स, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मर्व्ह ह्युज, ग्लेन मॅकग्रा, मार्क वॉ आणि इयान हिली यांचा यामध्ये समावेश होता.
शासकीय इतमामातही होणार अंत्यसंस्कार
शेन वॉर्नच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर खासगी अंत्यसंस्कार करण्याची ऑस्ट्रेलियन शासनाकडून परवानगी घेतली होती. आता वॉर्नवर 30 मार्चला मेलबर्न क्रिकेट मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वसामान्यांनाही सहभागी होता येईल. यावेळी एमसीजीच्या ग्रेट सदर्न स्टॅण्डला शेन वॉर्नचे नाव देण्यात येणार आहे.





























































