
राज्य सरकारने शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान आपल्या नियंत्रणाखाली घेत २२ सप्टेंबर रोजी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून तात्पुरती नियुक्ती केली. या विरोधात देवस्थानचे न्यासाचे अध्यक्ष व विश्वस्तांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिकेद्वारे आव्हान दिल्याने खंडपीठाने या प्रकरणात ‘जैसे थे’ आदेश दिले. या आदेशामुळे गैरसमजुतीतून विश्वस्त आणि प्रशासकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेली कार्यकारी समिती कारभार पाहत असताना धनादेशावर सह्यांचे अधिकार कुणाला, हे स्पष्ट नसल्याने न्यायालयाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षाही वाढली. दरम्यान, शनी मंदिरातील भाविकांसाठी असलेले प्रसादालय, दैनंदिन व्यवहार, पगार, तेल, प्रसादविक्री यावर परिणाम झाला असून, कारभार ठप्प झाल्याने शनीच्या साडेसातीचा फेरा कायम असल्याचे चित्र आहे.
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानचा गैरव्यवहार राज्यासह देशभर गाजला. राज्य सरकारने जगप्रसिद्ध देवस्थान आपल्या नियंत्रणाखाली घेऊन विश्वस्त मंडळ बरखास्त केले. त्याचवेळी पुढील व्यवस्थापन समिती स्थापन होईपर्यंत अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची प्रशासक म्हणून तात्पुरती नियुक्ती केली. तसा पदभार प्रशासक यांनी स्वीकारून येथील कार्यालय सील केले. त्याचदरम्यान विश्वस्तांनी जिल्हाधिकारी यांच्या निवडीला थेट आव्हान देत छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकेच्या सुनावणीत खंडपीठाने ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिले. हाच मुद्दा कळीचा ठरल्याने विश्वस्त व कार्यकारी समितीमध्ये खटके उडाले. तरीही ‘जैसे थे’ आदेशाच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या कार्यकारी समितीकडे कारभार आहे.
छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने १० नोव्हेंबर ही पुढील सुनावणीची तारीख ठेवल्याने तोपर्यंत कामकाज प्रशासक पाहत असले, तरी कामकाज पूर्णपणे ठप्प असल्याचे चित्र आहे. दरम्यानच्या काळात देवस्थानमधील दैनंदिन कामकाज व आर्थिक व्यवहारासाठी बँकेच्या धनादेशावर सह्यांचा मुद्दा पुढे आल्याने सह्यांच्या अधिकारासाठी संबंधित विश्वस्त व जिल्हाधिकारी यांच्या दोन्ही बाजूकडून खंडपीठात अर्ज सादर केल्याचे सांगण्यात येते.
जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या समितीत देवस्थानचे कार्यकारी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी कामकाज हाती घेतले असले, तरी न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांनाही दैनंदिन व्यवहार, वित्तीय बाबींवर सह्याचे अधिकार नसल्याने न्यायालयाच्या आदेशाची शासकीय अधिकारीसुद्धा वाट पाहत आहेत. हा तिढा कसा सुटणार, याकडे भाविकांसह संपूर्ण मंदिर परिसराचे लक्ष लागले आहे.
कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत
शनिशिंगणापूर देवस्थानवर सध्या प्रशासक आहे. देवस्थान न्यासाचे अध्यक्ष व विश्वस्तांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात प्रशासक निवडीला आव्हान दिले असताना न्यायालयाच्या ‘जैसे थे’ आदेशाचा फटका येथील कर्मचाऱ्यांना बसत आहे. चालू महिन्यातील पगार व दिवाळी तोंडावर आल्याने न्यायालयाच्या लढाईमुळे सह्यांच्या अधिकाराचा प्रश्न उपस्थित झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार होईनात. त्यामुळे येथील सर्व कर्मचारी सध्या पगाराच्या प्रतीक्षेत असून, दिवाळी अंधारात जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.