
मी पक्षाचा अध्यक्ष असल्याने कोणत्याही नेत्याला माझ्याशी सुसंवाद साधण्याचा अधिकार आहे. ‘त्यांनी’ काही मागण्या केल्या त्यावर चर्चा झाली होती, पण ते ज्या मार्गाने जाण्याचा विचार करत होते तो विचार आमच्या पक्षाच्या ध्येयधोरणाशी विसंगत होता. भाजपसोबत जायचे नाही ही आपली स्पष्ट भूमिका होती आणि आहे. त्यामुळे अजित पवार खोटं बोलताहेत. जे गेले त्यांची चिंता करण्याचे कारण नाही. त्यामुळे संघटना स्वच्छ व्हायला लागली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
कर्जत येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर अनेक आरोप केले होते. भाजपबरोबर जाण्यासाठी शरद पवारांबरोबर चर्चा झाली होती, असाही दावा अजित पवार यांनी केला होता. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार, पदाधिकाऱयांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवारांच्या प्रत्येक आरोप, दाव्यांचा जोरदार समाचार घेतला. ‘त्यांनी’ काल जे काय आरोप केले त्या गोष्टी मलाच पहिल्यांदा समजल्या. तो बॉम्ब होता का? स्पह्ट की फटाका होता? हे तुम्हीच पहा, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी लगावला. त्या आरोपांमध्ये सत्यता नसल्याने मी त्याला फार महत्त्व देत नाही. मी पक्षाचा अध्यक्ष असल्याने कोणत्याही नेत्याला माझ्याशी संवाद साधण्याचा अधिकार आहे. ‘त्यांनी’ ज्या मागण्या केल्या त्यावर चर्चा झाली, पण ते ज्या मार्गाने जाण्याचा विचार करत होते तो विचार आमच्या पक्षाच्या ध्येयधोरणाशी विसंगत होता. निवडणुकीत जनतेत जाऊन जी मते मागितली ती भाजपमध्ये जाण्यासाठी नव्हती. निवडणुकीत फॉर्म भरताना तो राष्ट्रवादीचा होता. माझ्या आणि जयंत पाटील यांच्या मान्यतेने त्यांनी तिकीटं दिली. त्यामुळे पक्षाच्या विचारांशी विसंगत भूमिका घेणे मान्य नाही, असे मी त्यांना बजावले होते. आज ‘ते’ खोटं बोलताहेत, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला. कोण गेलं त्याची चिंता करत बसण्याची गरज नाही. त्यामुळे संघटना स्वच्छ व्हायला लागली आहे. नवीन लोकांना संधी द्यायची परिस्थिती तयार झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. लोकांसमोर जाताना काय उत्तरे द्यायची याची त्यांना काळजी आहे. त्यामुळे ते खोटं बोलत आहेत, असे शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यांना फटकारले.
बारामतीसह चार लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढवणार, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. याकडे लक्ष वेधले असता शरद पवार म्हणाले, तक्रार करण्याचे कारण नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे.
तरी त्यांना केंद्रात मंत्री केले
2004 मध्येदेखील भाजपसोबत जाण्याचा राष्ट्रवादीचा विचार होता, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी कर्जत येथे केला होता. यावर शरद पवार म्हणाले, तो त्यांचा विचार होता. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता असे मी पटेल यांना सांगितले होते. माझा नकार असल्यानं ते थांबले, मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले. पराभूत झालेले असतानादेखील पक्षाने पटेल यांना केंद्रामध्ये मंत्रीपद दिले ही वस्तुस्थिती असल्याचे शरद पवार म्हणाले.
निर्णय घेण्याची कुवत माझ्यामध्ये आहे
राजीनामानाटय़ानंतर शरद पवार यांनीच तो पुन्हा मागे घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांना आंदोलन करण्यास सांगितल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यावर शरद पवार म्हणाले, मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे राजीनामा द्यायचा किंवा तो मागे घ्यायचा यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. राजीनामा दिल्यानंतर मी कोणालाही आंदोलन करा असे सांगितले नाही. राजीनामा देण्याचा निर्णय घेण्याइतकी कुवत माझ्यामध्ये आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱयांना तत्काळ मदत द्या
राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले असून आर्थिक अडचणीमुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे. राज्यात सध्या दुष्काळग्रस्त आणि अवकाळी पाऊस झालेल्या काही भागांचे पंचनामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे पंचनाम्यांचा वेग वाढवून सरकारने शेतकऱयांना तत्काळ आर्थिक मदत देण्यासाठी ठोस भूमिका घेतली पाहिजे. येत्या अधिवेशनामध्ये अस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानाबाबत चर्चा होईलच, पण त्यापूर्वीच शेतकऱयांना तातडीने मदत देण्यासाठी सरकारने पावले उचलावी, असे शरद पवार म्हणाले.
मुश्रीफ पाच तास घरी बसून विनवणी करत होते – अनिल देशमुख
अनिल देशमुख माझ्या सोबत होते. त्यांना मंत्रिमंडळात जायचे होते, मात्र त्यांच्यावर अनेक आरोप असल्याने त्यांना लगेच मंत्रिमंडळात घेता येणार नसल्याचे भाजपने सांगितल्याचा दावा अजित पवार यांनी कर्जत येथील बैठकीत केला होता. याबाबतच्या प्रश्नावर अनिल देशमुख यांनी गौप्यस्पह्ट केल़ा अजित पवार गटामध्ये येऊन भाजपसोबत युती करण्यासाठी हसन मुश्रीफ पाच तास माझ्या घरी बसून विनवणी करत होते. त्यासाठी हवे ते खाते देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. पण ज्या भाजपने मला त्रास देऊन मला खोटय़ा गुह्यात अडकवले त्या भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे देशमुख यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी सिंचन घोटाळय़ाबाबत कोणावर आरोप केले होते?
शरद पवार यांनी नाव न घेता सिंचन घोटाळय़ावरून अजित पवार यांना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे भाषणात सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँकबाबत कोणावर आरोप केले होते, ते शोधा, असा सवाल करीत शरद पवार यांनी अजित पवारांना फटकारले.
पक्ष सोडून गेलेला एकही पुन्हा विधानसभेत दिसला नाही
1978 साली तरुणांना संधी देऊन आम्ही निवडणूक लढविली आणि साठ आमदार निवडून आले. त्यानंतर काही दिवसांसाठी मी परदेशात गेलो. तेथून परत आल्यानंतर साठमधील माझ्यासह केवळ सहाजण शिल्लक होते, मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आम्हाला सोडून गेलेल्यांपैकी एकही आमदार विधानसभेत पुन्हा दिसला नाही, असा सूचक इशारा शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला.
ईडीने का कारवाई केली यावर पटेलांनी पुस्तक लिहावे
प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना, माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. भविष्यात मी पुस्तक लिहिणार आहे असे वक्तव्य केले होते. याकडे लक्ष वेधले असता शरद पवार यांनी सणसणीत टोला लगावला. पटेलांनी पुस्तक लिहिताना त्यांच्या घरामध्ये ईडीचे अधिकारी का आले होते? दिल्लीतील प्रकरण त्या पुस्तकात लिहावे. घराचे काही मजले ईडीने का ताब्यात घेतले होते यावर प्रकरण पुस्तकात लिहावे. तसेच लोक पक्ष सोडून कसे जातात यावरही पटेलांनी लिहावे. पुस्तकाची मी वाट पाहत असल्याचे पवार म्हणाले.


























































