
मुख्यमंत्री म्हणतात इथे सक्षम विरोधक नाहीत. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. पण कुस्ती पैलवानांशी होते, या ‘इतरांशी’ होत नाही असे विशिष्ट आणि आक्षेपार्ह हातवारे करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोलापूरमधील बार्शी इथे झालेल्या सभेत शरद पवार यांनी विरोधक थकलेत, आमच्याशी कुस्ती लढायला समोर कुणीच नाही असे म्हणणार्या फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. कुस्ती पैलकानांशी होते, या ‘अशांशी’ नाही असे विशिष्ट हातवारे करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले. जर सत्ताधार्यांच्या मते इथे काही ताकदीच्या निवडणुका नाहीत तर मग देशाचे पंतप्रधान राज्यात प्रचाराला का येतात, असा टोला पवार यांनी यावेळी लगावला.
भाजपकडून संताप
मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह हातवारे करणारा पवारांच्या भाषणाचा व्हिडीओ काही वेळातच सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर भाजपाकडून संताप व्यक्त केला जात आहे. भाजप प्रवक्ते मधु चव्हाण यांनी इतकी वर्षे राजकारणात असलेल्या माणसाने असे करणे शोभत नाही. त्यांचा तोल आधीच गेला होता, आता पराभवाच्या भीतीने ते अधिकच बिथरले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.




























































