शरद पवार यांचा कल शिवसेना आणि मनसेसोबत एकत्र लढण्याचा, कार्यकर्त्यांचा काँग्रेससोबत जाण्याला विरोध

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकटय़ा काँग्रेससोबत जाण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी विरोध केला आहे. मुंबईत शिवसेना आणि मनसेला सोबत घेऊन एकत्र निवडणूक लढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कल आहे. यासंदर्भात ते संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत.

मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुंबई काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेशी आघाडी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. भाजप सोडून इतरांसोबत युती करण्यास हरकत नाही. समाजवादी पक्ष किंवा मनसेलादेखील सोबत घेण्यास हरकत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आली.

ही तर लोकेच्छा – संजय राऊत

दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही, हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, ही लोकेच्छा आहे. त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. शरद पवार आणि डावे पक्षसुद्धा एकत्र आहेत. मुंबई वाचवा!, अशी भूमिका शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ पोस्ट करत मांडली आहे.

काँग्रेसचे वडेट्टीवारही सकारात्मक

मुंबईत काँग्रेसने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. मात्र काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी मनसेसोबत आघाडी केल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी सांगितले. शरद पवारांप्रमाणे मलाही आघाडी करूनच लढावे, असे वाटते. विचार जुळत नसले तरी भाजपविरोधात सगळय़ांनी एकत्र यावे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.