Sharad Pawar House Attack – गुणरत्न सदावर्ते यांचा जामीन फेटाळला, दोन दिवसांची पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 107 आंदोलकांना अटक केली होती. गुणरत्न सदावर्तें यांना आज किला न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिथे त्यांचा जामीन फेटाळण्यात आला असून त्यांना दोन दिवासंची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणातील 109 एसटी कर्मचारी आंदोलकांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

शुक्रवारी म्हणजेच 08 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला होता. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी हा हल्ला केला होता आणि या प्रकरणी पोलिसांनी 23 महिलांसह 107 आंदोलकांना अटक केली होती. या कर्मचाऱ्यांची माथी भडकावल्याचा वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आरोप असून त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सदावर्ते यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. सदावर्ते यांनी आंदोलकांसमोर चिथावणीखोर विधाने केली असल्याचं स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या प्रथम खबर अहवालात म्हटलंय की सदावर्ते यांनी 07 एप्रिल रोजी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी आम्ही शरद पवारांच्या घरात घुसून त्यांना जाब विचारू असं म्हटलं होतं. त्यांनी हे विधान केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पवारांच्या मुंबईतील निवासस्थानावर हल्ला झाला होता.

अटक, जेजे ते गिरगाव

सदावर्ते यांची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना कट रचणे आणि चिथावणी देणे या गुन्हय़ात अटक केली आणि वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जेजे रुग्णालयात घेऊन गेले. सदावर्ते यांना आज गिरगाव कोर्टात हजर केले.

आझाद मैदानातील ‘ते’ पोस्टर

गुरुवारी उच्च न्यायालयाच्या निकालानंतर ऍड. सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांसमोर विजयाचे भाषण ठोकले. त्यावेळी तेथे एक पोस्टर लावण्यात आले होते. त्या पोस्टरचे छायाचित्र आजच्या हल्ला प्रकरणानंतर सोशल मींडियावर व्हायरल झाले होते. कारण त्या पोस्टरवरील शेवटची ओळ होती ‘सावधान शरद, सावधान शरद.’