
विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नाही. विद्यार्थ्यांचा आवाज बळाने दडपता येणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर केली. सरकारने आंदोलन करणारे विद्यार्थी आणि नागरिकांवर दडपशाही करण्यापेक्षा त्यांच्या मागण्यांवर संवेदनशीलपणे विचार करावा, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
शरद पवार यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांची भेट घेतली. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके याच्यासोबतही त्यांनी चर्चा केली तसेच काल पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या विद्यार्थ्याबाबतही पवार यांनी विचारपूस केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यादेखील त्यांच्यासोबत होत्या. त्यानंतर पवार यांनी एक्सवर पोस्ट करुन मोदी सरकवर टीका केली. त्यांनी लिहिले की, नीट परीक्षेतील पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी उपोषण आणि आंदोलन केले. सोमवारी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढा देणाऱया पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नाही. योग्य आणि पारदर्शी परीक्षा यंत्रणेची मागणी करणाऱया विद्यार्थ्यांचा आवाज बळाच्या जोरावर दडपता येणार नाही. आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. न्याय मिळेपर्यंत या आंदोलनाला आम्ही समर्थन करू, असे शरद पवार म्हणाले. नागरिकांच्या हक्कांना आणि अधिकारांना संविधानाने संरक्षण दिले आहे. सरकार आणि प्रशासन जनतेला उत्तरदायी आहे, असेही पवार यांनी म्हटले.





























































