
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्ष मिळून काम करत आहेत. सचिन वाझे प्रकरणाचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कायमच चर्चा
सरकारसमोर काही समस्या येत असतात. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करून त्या सोडवल्या जातात. आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण कायमच भेटतो आणि बोलतो. वेगवेगळ्या मुद्दय़ांवर आमच्यात चर्चा होत असते, असे शरद पवार म्हणाले.
एका सब इन्स्पेक्टरचा परिणाम संपूर्ण सरकारवर होईल असे मला वाटत नाही. ज्या लोकांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी या राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. त्यांना तपासात सहकार्य करणे आपले कर्तव्य असल्याचे पवार म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण व्यवस्थित हाताळले आहे, त्यामुळे सगळे एकजूट झाले आहेत. चुकीचं काम करणाऱया लोकांना शोधलं. त्यांचा पर्दाफाश केला आणि सक्तीने पाऊल उचलू शकतो हे दाखवून दिलं, अस सांगत शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली.
परमबीर सिंह यांची बदली होणार आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा. कोणाच्या नियुक्ती आणि बदलीबाबत आम्हाला रस नसल्याचे पवार म्हणाले.
तिसऱया आघाडीची ठोस चर्चा नाही
भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून तिसरी आघाडी उभी करण्याची गरज आहे. पण त्यावर अद्याप ठोस पुठीलीही चर्चा झालेली नाही. माकप नेते सीताराम येच्युरी यांनी तिसरी आघाडी उभी करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. पण अद्याप याला पुठलंही स्वरुप आलेलं नाही, असं शरद पवार यांनी सांगितले.
काँग्रेस नेते पी.सी. चाको राष्ट्रवादीत
केरळमधील काँगेस पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या पी.सी. चाको यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.



























































