
केंद्रात ज्यांचे सरकार आहे त्यांनी तरी तारतम्य बाळगावे, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कोरोना संकटात मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱया राज्यातील भाजप नेत्यांना आज चांगलेच खडे बोल सुनावले. ईडीचा गैरवापर करून विरोधकांना नमविण्याच्या केंद्र सरकारकडून होणाऱया प्रयत्नांबद्दलही पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
मंदिरे उघडण्याच्या मुद्यावरून भाजप, मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेचे संकट असताना मंदिरे उघडा म्हणणाऱयांचा शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.
पवार म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारला यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. त्यामध्ये आणखी काही दिवस थोडी खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे राज्यसरकार विशेषताः मुख्यमंत्री कटाक्षाने आवाहन करत आहेत. अन्य घटकांची त्याबद्दल काही मते असू शकतात. लोकशाहीत त्यांना ते मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, केंद्र सरकार ज्यावेळी अशी भूमिका घेतं. त्यावेळी कमीत कमी त्या केंद्र सरकारच्या विचाराचे जे राज्यात लोक आहेत, त्यांनी तरी तारतम्य ठेवायची गरज होती. याबद्दल मला काही अधिक सांगायचं नाही, असा टोला त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला.
विरोधकांना नमविण्यासाठी ‘ईडी’चा गैरवापर
देशात यापूर्वी ‘ईडी’ आणि अन्य तपास यंत्रणांचा वापर चुकीच्या पद्धतीने कधीही केला गेला नव्हता. परंतु हल्लीच्या सरकारने या यंत्रणेचा वापर विरोधकांना नमवण्यासाठी करण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यामुळे हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिणेतील काही राज्यांमध्ये होत असल्याचे शरद पवार म्हणाले.
मी दिलेला शब्द पाळलाय
राज्य सरकारने विधान परिषदेच्या 12 रिक्त जागांसाठी नावांची यादी दिली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, असा प्रस्ताव राज्यपालांकडे आम्ही दिलेला आहे. त्यावर राज्यपालांकडून निर्णय झालेला नाही; परंतु मी दिलेला शब्द पाळला आहे. राजू शेट्टींनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.































































