शरद पवार हृदयात बोलणाऱ्यांचे हृदय तपासा,भाजपात भरती झालेल्यांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar-new

सामना ऑनलाईन, सातारा

राष्ट्रवादी काँगेस सोडून जाणारे ‘पवारसाहेब आमच्या हृदयात आहेत’ असे सांगतात त्यावर ‘त्यांच्या हृदयाची साइज तपासावी लागेल’ अशी खोचक व मिष्कील टिप्पणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली. सातारा जिह्यातील आणखी किती लोक पक्ष सोडून जाणार, यावर ‘मला कल्पना नाही, मात्र यशवंतराव चव्हाण यांचा विचार ज्यांनी स्वीकारला आहे ते असे काही करणार नाहीत’ असे त्यांनी सांगितले.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार बुधवारी रात्री साताऱ्यात दाखल झाले. आज सकाळी सांगली जिह्यातील वाटेगावला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात आमच्याकडे उमेदवाराची चिंता नाही. आताच माझ्याकडे तीन अर्ज आले असून ही जागा राष्ट्रवादीच राखणार असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. पक्षातून तीन लोक गेल्याने मोठा फरक पडलेला नाही. कधी कधी असे घडते. अशा प्रसंगाचा सामना करण्याचा मला चांगला अनुभव आहे. 1980 साली माझ्या पक्षातील 52 आमदार पक्ष सोडून गेले होते पण त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्या 52 पैकी एकही आमदार निवडून आला नाही असा गर्भित इशारा त्यांनी दिला. हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक घेतले म्हणजे ती मेगाभरती होत नाही अशी टीका त्यांनी केली.

आमदार शिवेंद्रराजे आपणास पुण्यात भेटले होते तेव्हा त्यांनी पक्ष सोडणार नाही असे सांगितले होते, परंतु ते सत्य सोडून काही सांगतात याबद्दल मला माहीत नव्हते असा टोला त्यांनी शिवेंद्रराजे यांना लगावला. खासदारांसमवेत बैठक करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार संसदेचे अधिवेशन झाल्यानंतर बैठक करावी असे ठरले होते. पण काही संघर्ष आहे म्हणून नव्हे तर सत्तेमध्ये नसल्यामुळे मतदारसंघातील कामे होत नाहीत असे त्यांच्या बोलण्यातून दिसते याकडे पवार यांनी लक्ष वेधले. ज्यांच्या हातात राज्य आहे ते विरोधी लोकप्रतिनिधींच्या रास्त प्रश्नांमध्ये लक्ष देत नाहीत, त्यांच्या बाबतीत सूडबुद्धीने वागतात असा थेट आरोप त्यांनी केला.