शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार यांना आणखी एका शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या तोंडात अल्सर आढळल्याने ब्रीच पॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हा अल्सर काढून टाकण्यात आला असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. ‘पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळला असून तो काढण्यात आला आहे.

शरद पवार यांची तब्येत चांगली असून ते आता रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. शिवाय देशभर पसरलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावादेखील घेत आहेत. ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरू करतील.’ असादेखील विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

21 दिवसांत तिसरी शस्त्रक्रिया

शरद पवार यांना 21 एप्रिल रोजी ब्रीच पॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. 21 दिवसांतील ही तिसरी शस्त्रक्रिया होती. त्याअगोदर 30 मार्चला पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांच्यावर ब्रीच पॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर 12 एप्रिलला पित्ताशयावरील शस्त्रक्रियेसाठी ते पुन्हा ब्रीच पॅण्डी रुग्णालयात दाखल झाले होते. ही शस्त्रक्रियाही यशस्वीरीत्या पार पडली होती.