Share Market News – दोन दिवसात कमावले, ते एका तासात गमावले; शेअर बाजारात मोठी घसरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर बाजारात दोन दिवसांच्या तेजीनंतर शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे दोन दिवसाच्या तेजीत जे कामावले ते शुक्रवारी एका तासात गमावले, अशी शेअर बाजाराची स्थिती झाली आहे. दोन दिवसाच्या तेजीत निर्देशांक जेवढा वधारला होता. शुक्रवारी तेवढाच तो घसरला आहे.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सेन्सेक्स ३८९ अंकांनी घसरून ७४,८८३ अंकांवर उघडला. तर निफ्टी १३२ अंकांनी घसरून २३,१७३ अंकांवर सुरू झाला. अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांचा बाजारावरील विश्वास कमी झाला आहे. तसेच भारतीय रुपयाने प्रथमच प्रति अमेरिकन डॉलर ९४ चा टप्पा ओलांडला. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

बाजाराच्या व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतरही बाजार दबावात होता आणि घसरण सुरुच होता. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1117.32 अंकांच्या म्हणजेच 1.48 टक्के घसरणीसह 74,149.80 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 336.75 अंकांच्या म्हणजेच 1.44% घसरणीसह 23,034 . 50 वर व्यवहार करत होता.

अमेरिकन बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून आली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज ४६९ अंकांनी घसरला, तर एस अँड पी ५०० १.७४% आणि नॅसडॅक २.३८% ने घसरला. तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सवर सर्वाधिक दबाव होता, ज्यात एनव्हिडिया, एएमडी, मेटा आणि अल्फाबेटच्या शेअर्समध्ये ३% ते ८% पर्यंत घसरण झाली.

आशियाई बाजारांमध्येही विक्रीचा दबाव कायम होता. जपानचा निक्केई २२५ १.६% ने घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ३.६% ने खाली आला. तज्ज्ञांच्या मते, जागतिक भावना कमकुवत असून गुंतवणूकदार भू-राजकीय घटनांबाबत सावध आहेत.