शेअर बाजाराची उसळी; मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 49 हजार पार

शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवसाची दमदार सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या संकटातही शेअर बाजाराने मोठी झेप घेतली आहे. देशभरात 16 जानेवारीपासून कोरोनाची लस देण्यास सुरुवात होणार आहे. त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाला असून मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 49 हजाराचा टप्पा पार केला आहे. तर निफ्टीच्या निर्देशांकातही वाढ झाली आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 470 अंकांची झेप घेत 49,252 अंकावर बाजार सुरू झाला. तर निफ्टीही 127 अंकाची वाढ नोंदवत 14,474 अंकांवर सुरू झाला. कामकाजाला सुरुवात झाल्यावर निर्देशांकांने ऑल टाईम हाय नोंदवत 49,269.02 अंकांचा स्तर गाठला. कोरोना लस देण्याच्या घोषणेने शेअर बाजार तेजीत असून उत्साहाचे वातावरण आहे.

इन्फोसिस, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, विप्रो आणि एचडीएफसीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर आयटी इंडेक्समध्ये 2 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तर मेटलमध्ये 1 टक्क्याची वाढ झाली आहे. सुरुवातीच्या कामकाजात सुमारे 1270 शेअरमध्ये तेजी होती. तर 307 शेअरमध्ये मंदी असून ते लाल निशाणीवर होते.

इन्फोसिसच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून त्यात 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. एचसीएल, टीसीएस, हिंदुस्तान यूनिलिवर, एचडीएफसी, डॉक्टर रेड्डी आणि सनफार्मा यांचे शेअरही तेजीत होते. भारती एअरटेलच्या शेअरमध्येही 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बजाज फायनान्सचा शेअर मंदीत होता. त्याच्या शेअरमध्ये 1.48 टक्क्यांची घट झाली आहे.

सोमवारच्या कामकाजात फार्मा, आयटी, बँकिंग आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी आहे. मुंबई बाजारातील 30 पैकी 17 आणि निफ्टीतील 50 पैकी 23 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या