
न्यू इंग्लंड बेटाजवळील मायने समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या महिलेचा शार्कच्या हल्ल्यात मृत्यू झालाची घटना घडली आहे. कॅस्को खाडीजवळील बेली बेटावर राहणाऱ्या स्थानिकांनी महिलेला समुद्रात जाण्यापासून रोखले होते. समुद्रात शार्क असल्याची शक्यता आहे, त्यामुळे समुद्रात जाऊ नको, असे त्यांनी महिलेला सांगितले होते. मात्र, तिने स्थानिकांचा सल्ला मनावर घेतला नाही आणि ती समुद्रकिनारी गेल्याने शार्कने तिच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोर्टलँडच्या ईशान्य दिशेला बेटांचा समूह आहे. तेथील या बेटावरील हार्सवेलजवळ शार्कने महिलेवर हल्ला केल्याची शक्यता कंबरलँड शहराचे शेरीफ एनिस राइट यांनी वर्तवली. अमेरिकेच्या ईशान्यकडे असलेल्या या बेटांवर यापूर्वी कधीही शार्कने हल्ला केला नव्हता. पहिल्यांदाच या बेटाजवळ अशाप्रकारची घटना घडली आहे. शार्कने हल्ला केल्यानंतर जखमी झालेल्या महिलेला तटरक्षक दलाच्या जवानांनी तातडीने किनाऱ्यावर आणले. तिथे तणसणीनंतर तिला मृत घोषित करण्यात आले. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. तिची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ती कोणाबरोबर आली होती, याची माहिती घेण्यात येत आहे. घटना घडली त्यावेळी तिच्यासोबत आणखी कोणी पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते का, याचीही अधिकारी माहिती घेत आहेत.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेवर शार्कने हल्ला केल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, याआधी कधीही या समुद्रकिनारी शार्कचा वावर नव्हता किंवा शार्कच्या हल्ल्याची घटनाही घडली नव्हती. त्यामुळे या घटनेचे वृत्त आल्यानंतर या घटनेवर विश्वास बसत नसल्याचे अनेकांनी सांगितले. या घटनेनंतर तटरक्षक दलाने या किनाऱ्याजवळ नौकाविहारासाठी आणि पोहण्यासाठी मनाई केली आहे. याआधी 2010 मध्ये स्कॉट मॅकनिचोल विशेष कॅमेऱ्याने पाण्याखालील चित्रीकरणासाठी गेला असता त्याच्यावर शार्कचा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्या घटनेला दुजोरा मिळालेला नाही.






























































