विठूमाऊलीलाही थंडी लागते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पंढरपूर

‘यथा देहे तथा देवे’ या उक्तीप्रमाणे मनुष्यप्राण्याप्रमाणे देवाच्या मूर्तीवर दैनंदिन नित्यकर्म करा, असे अध्यात्म सांगते. त्याप्रमाणे पंढरीच्या पांडुरंगाला नित्य राजोपचार करताना ऋतुमानाचा विचार केला जातो. सध्या थंडीचा मोसम सुरू असल्यामुळे राजस सुकुमार अर्थात सावळय़ा विठूरायाला थंडी वाजू नये म्हणून त्याच्या कानावर कानपट्टी बांधून अंगावर शाल आणि रजई घातली जात आहे. त्याप्रमाणेच रुक्मिणी मातेच्या अंगावरही उबदार शाल पांघरण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी थंडीच्या महिन्यात पांडुरंगाला अशाप्रकारे पोशाख परिधान करण्यात येतो. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही सुरू असून, सध्या पंढरीत तापमानाचा पारा 18 अंशावर आहे.

रात्रीच्या शेजारतीनंतर विठूराया जेव्हा निदेसाठी जातो तेव्हा त्याच्या अंगावरील पोशाख काढून देवाचे अंग पुसून घेण्यात येते. त्यानंतर मुकुट काढून तेथे दीड ते दोन मीटर लांबीचे खास उबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर वैशिष्टय़पूर्ण पद्धतीने बांधण्यात येते. पहाटे नित्य पूजा झाल्यानंतर पहाटेच्या वाऱयाचा देवाला त्रास होऊ नये म्हणून काही वेळ देवाच्या दोन्ही कानांवरून सुती उपरणे बांधण्यात येते. यानंतर देवाच्या उघडय़ा अंगावर पांढराशुभ्र उबदार शेला डोक्यापासून पायापर्यंत टाकण्यात येतो. यावर पारंपरिक असलेली देवाची उबदार शाल अंगावर टाकून त्यावर खास कश्मिरी रजई घालण्यात येते. या पोशाखामुळे देवाला नखशिखांत उबदारपणा जाणवेल याची खबरदारी घेतली जाते. यानंतर विठूमाऊलीला तुळशीहार घालून आरती करून निद्रेसाठी सज्ज केले जाते. साधारणतः होळीपर्यंत हे उबदार कपडे देवाला घालण्यात येतात.

उन्हाळय़ात चंदनउटी पूजा
उन्हाळय़ात देवाला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सुमारे 90 दिवस दररोज देवाची चंदनउटी पूजा केली जाते. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या या पूजेसाठी दररोज सुमारे 400 ग्रॅम चंदन उगाळून संपूर्ण अंगावर लावले जाते.

ऋतूप्रमाणे नैवेद्यात बदल
ऋतुमानाप्रमाणे देवाच्या नैवेद्यातदेखील बदल करण्याची परंपरा आहे. देवाच्या नैवेद्यात थंडीच्या काळात बासुंदी, उन्हाळय़ात आमरस तर अन्य काळात श्रीखंडाचा समावेश केला जातो.