
यंदाच्या वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे रत्नागिरी शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या ६० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मार्च महिन्यामध्ये रत्नागिरी शहरावर पाणी कपातीचे संकट ओढवणार आहे. जून महिन्यापर्यंत शहराला पाणी पुरवठा करण्याकरीता रत्नागिरी नगरपरिषदेला पाणी कपात करणे अनिवार्य ठरणार आहे.
यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. कमी पावसामुळे शीळ धरणात पाणीसाठाही कमी झाला. डिसेंबर महिन्यापर्यंत पानवल धरणातून पाणी पुरवठा सुरु होता. मात्र आता पानवल धरण कोरडे झाले आहे. सध्या शीळ धरणातून रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा सुरु आहे. शीळ धरणामध्ये सध्या 1.828 द.ल.घ.मीटर पाणीसाठा आहे. पाण्याचा साठा पाहिल्यास यंदा रत्नागिरी शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
सध्या रत्नागिरी शहरात दर सोमवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र पुढील काही दिवसात रत्नागिरी शहरावर पाणी टंचाईचे संकट ओढवणार आहे. गतवर्षीं मार्च महिन्यात शीळ धरणामध्ये 65 टक्के पाणी साठा होता. यंदा तो 60 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. काही दिवसांनंतर एक दिवस आड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

























































