
जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या विरोधात पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी शुक्रवारी जाहीर भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांना माईकमधून वीजेच्या प्रवाहाचा करंट लागला होता. या प्रसंगामुळे घाबरलेल्या रशीद यांनी यामागे हिंदुस्थानचा हात असल्याचं हास्यास्पद वक्तव्य केलं आहे.
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थान विरोधात नागरिकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. मात्र याच जनतेच्या आंदोलनात पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी मोदींविरोधात बोलण्यास सुरुवात करताच माईकमधून वीजेचा प्रवाह वाहू लागला आणि त्यांना करंट लागला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे रशीदही घाबरले. पण मोदी आमचे हे आंदोलन थांबवू शकत नाही असे म्हणत त्यांनी सारवासारव केली. शेख यांच्या या फजितीचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच हुर्यो उडवली.
मोदींचे नाव घेताच पाकिस्तानी मंत्र्याला लागला करंट
त्यावर चिडलेल्या शेख रशीद यांनी हे विधान केलं आहे. काल मला विजेचा शॉक लागला. ती बातमी हिंदुस्थानची प्रसारमाध्यमं वारंवार दाखवत होती. त्यामागे हिंदुस्थानचा हात असून हिंदुस्थानला मला संपवायचं आहे. मी हिंदुस्थानला सांगू इच्छितो की, मी इतक्या लवकर मरणार नाही आणि जोवर मी जिवंत आहे, तोवर मी तुम्हाला सोडणार नाही, असं वक्तव्य रशीद यांनी केलं आहे.


























































