
सामना प्रतिनिधी, अलिबाग
शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख पदी महेंद्र दळवी यांची नव्याने निवड झाली असून झिराड येथे अलिबाग तालुका शिवसेनेतर्फे सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी काँग्रेस, शेकापचे असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेने पक्षात प्रवेश केला. सहसपंर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना तालुका प्रमुख राजा केणी, मराठा महा संघाचे अध्यक्ष विकास गावडे, संघटक सतीश पाटील, मुन्ना कोटीयन आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यात शिवसेनेने पक्ष बांधणी करण्यास जोरदार सुरुवात केली आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवून इतर पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. अलिबागमधील मापगाव जिल्हा परिषद गणातील असंख्य शेकाप व काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा मतदारसंघात शिवसेना भगवा फडकविण्याच्या तयारीला लागली आहे.




























































