अभिप्राय – शेतकऱ्यांचे प्रतिपालक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सुरेश चव्हाण<<

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अनेक ग्रंथ, नाटकं, चित्रपट आतापर्यंत आले आहेत. त्यांच्या कर्तृत्वावर महाकाव्ये, खंडकाव्येही लिहिली गेली. याचे कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून विलक्षण ऊर्जा मिळते. राजाने प्रजेशी कसे वागावे, राज्यकारभार कसा करावा हे आजच्या राज्यकर्त्यांनी शिकावे, असा आदर्श महाराजांनी घालून दिलेला आहे. त्यांचे ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र जगभरात अगदी आजच्या युद्धातही वापरले जाते, हेच महाराजांचे मोठेपण आहे.

‘शेतकऱ्यांचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज’ हा रवींद्र छोटू पाटील यांनी लिहिलेला ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. आतापर्यंत आलेल्या अनेक शिवचरित्रांपेक्षा हा ग्रंथ वेगळा आहे. अनेक ग्रंथांचा, बखरींचा, जुन्या कागदपत्रांच्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. कुठल्या वेळी कुठले प्रसंग घडले, याची सविस्तर माहिती सनावळ्यांसह मांडली आहे. त्यामुळे त्यांची सत्यता पटण्याजोगी आहे. आजवर महाराजांच्या जीवनावर काल्पनिक कादंबऱ्या, नाटकं बरीच आली, पण हा ग्रंथ महाराजांची शेतकऱ्यांबद्दलची आस्था, दूरदृष्टी उलगडतो. महाराज केवळ ‘गो-ब्राह्मणप्रतिपालक’ नव्हते तर ते जनतेचे तसेच शेतकऱ्यांचे प्रतिपालक होते. ते शेतकऱ्यांचे राजे होते. हीच मांडणी पाटील यांनी आपल्या ग्रंथात केली आहे.

या ग्रंथाची सुरुवात 1303 साली चित्तोडच्या संग्रामापासून होते. त्याकाळी महाराष्ट्राची, मराठी माणसांची काय स्थिती होती याचा इतिहास, भोसले घराण्याचा इतिहास नावांसह व सनावळ्यांसह या ग्रंथात सांगितलेला आहे. एवढंच नव्हे तर सातव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी ‘ह्यु-एन-त्संग’ याने मराठ्यांबद्दल काय लिहून ठेवलं आहे, हेही वाचायला मिळतं.

जगात कोणतीही क्रांती कष्टकरी जनतेतून होते, हा इतिहास आहे. लेखकाने अनेक इतिहासकारांची व विद्वान अभ्यासकांची छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची मतं या ग्रंथात निर्भीडपणे लिहिलेली आहेत. ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य’ या ग्रंथात म्हटलेलं आहे, ‘अनेकांच्या मनात वर्तमानकाळातील हिंदू विरुद्ध मुसलमान अशा प्रकारचा झगडा असतो. स्वतच्या मनातील हा असत्य आणि अनुचित संघर्ष मागच्या इतिहासामध्ये पाहण्याची काही जणांची धडपड असते. या दृष्टीने शिवाजी महाराजांकडे ‘हिंदूंचा राजा’ म्हणून पाहणे काही जणांना आवडते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही.’

व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी महाराजांविषयी म्हटलं आहे, ‘शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्मले असते तर आम्ही जगावरच काय परग्रहावरही राज्य केले असते!’ इंग्लंडहून भारतावर राज्य करण्यासाठी आलेल्या लॉर्ड माऊंटबॅटनची ही धारणा होती. महाराजांचा मोठेपणा जगाने मान्य केला आहे.

स्वामी विवेकानंद यांनी शिवाजी महाराजांविषयी म्हटलं आहे, ‘भारताची ओळख जगाला विविध अंगांनी आहेच, पण भारताची समतोल ओळख जगाला सांगायची झाल्यास शिवरायांची तत्त्वे व तत्त्वज्ञान, सामाजिक, धार्मिक, राजकीय, शेतकरी, आर्थिक, शिवरायांचे परराष्ट्र धोरण व त्यातील विचार व आचार हीच नव्या भारताची ओळख होऊ शकते.’ अनेक वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी हे विचार मांडले, जे आजही आचरणे गरजेचेच आहे.

या पुस्तकाचे वेगळेपण हेच आहे की, आजच्या काळात जो धार्मिक विद्वेष पसरवला जात आहे; हिंदुत्वाविषयीचे चुकीचे समज दाखवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महाराजांचे खरे विचार हे सर्वधर्मसमभाव साधणारे होते. या ग्रंथात लेखकाने 1645 ते 1680 पर्यंत शिवाजी महाराजांची शिक्कामोर्तब असलेली पत्रं तपासून महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडले आहेत. महाराजांचे शौर्य, धैर्य, हुशारी, प्रजेची काळजी, लोकांनुवर्तीत न्याय, शासकीय कुशलता, शिस्त, संघटन कौशल्य, अखंड सावधानता, दूरदृष्टी व देशाभिमान असे अनेक गुण या पत्रांतून दिसून येतात. त्यामुळे हा ग्रंथ वेगळा, अभ्यासपूर्ण, वाचनीय झाला आहे. सतीश भावसार यांचे मुखपृष्ठही या ग्रंथाला साजेसं आहे.

शेतकऱ्यांचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज 

ह लेखक ः रवींद्र छोटू पाटील 

ह प्रकाशक ः ग्रंथाली प्रकाशन 

ह पृष्ठे ः 398  ह मूल्य ः 600 रुपये