सीना नदीपात्रातील ‘शिल्पागार्डन’वर अखेर हातोडाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नगर

गेल्या महिनाभरापासून शहरातील सीना नदीपात्रात अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू आहे.रविवारी सुटीच्या दिवशीही ही कारवाई सुरूच होती. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱया ‘शिल्पा गार्डन’च्या नऊ शाळाखोल्यांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. दरम्यान, सीमानिश्चितीकरणावरून महसूल प्रशासन आणि संबंधित अतिक्रमणधारकांमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी अतिक्रमणधारक शरद मुत्था यांनी माझ्याकडे न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याचे सांगितले. यावर प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी लेखी आदेश दाखविण्याची मागणी केली. मात्र, लेखी आदेश दाखविण्यास मुत्था यांनी टाळाटाळ केल्याने अखेर या शाळाखोल्या पाडून टाकण्यात आल्या. दरम्यान, आज दुपारी ‘आनंद ट्रेडिंग’चे पक्के बांधकाम हटविण्यात आले.

सीना नदीतील अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात गाळ, बाभळी, झुडपे, वीटभट्टय़ांवर कारवाई करण्यात आली. दुसऱया टप्प्यात पक्क्या बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. नदीपात्रात अनेकांनी पक्की बांधकामे केली आहेत. आज सकाळी साडेसात वाजल्यापासून सीना नदीपात्रामध्ये आलेल्या शाळाखोल्या व अतिरिक्त बांधकाम, मंगल कार्यालयाचा ओटा तोडण्यात आला. ‘शिल्पा गार्डन’चे मालक शरद मुत्था यांनी गाळपेरीच्या नावाखाली या ठिकाणी खोल्या बांधल्या होत्या. आजच्या कारवाईवेळी मुत्था यांनी प्रशासनाच्या कारवाईला स्थगिती मिळाली असल्याचे सांगितले. यावेळी प्रांताधिकारी गडेकर, तसेच कोतवालीचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी तेथे उपस्थित होते. कोणत्याही प्रकारचे आदेश नसल्यामुळे आम्ही कारवाई सुरू ठेवणार आहे. लेखी आदेश असेल, तरच कारवाई थांबविली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुत्था यांच्याकडून लेखी आदेश न मिळाल्याने शिल्पा गार्डनमधील अतिक्रमण काढून टाकले असून, या ठिकाणी चर खोदून नदीपात्राची हद्दही निश्चित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, नायब तहसीलदार अर्चना भाकड पागिरे, नायब तहसीलदार वैशाली आव्हाड, मंडलाधिकारी राजेंद्र आंधळे, मंडलाधिकारी रिजवान शेख आदी अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून होते. दुपारी दोन वाजल्यानंतर येथील ‘आनंद मार्बल’चे मोजमाप सुरू करण्यात आले. संबंधित मालकाने ‘आमचे नुकसान होऊ देऊ नका. आम्ही स्वतःहून बांधकाम काढतो,’ असे सांगितले. यावर महसूल प्रशासनाने अर्ध्या तासाची वेळ दिली. ‘वेळेत अतिक्रमण काढले नाही, तर आम्हाला कारवाई करावी लागेल,’ असे स्पष्ट निर्देश प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिले. निवासी जिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी या ठिकाणी भेट घेऊन माहिती घेतली. दुपारनंतर पुन्हा कारवाई सुरू झाली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे पथकासह या कारवाईत सहभागी झाले होते.