
>> शिल्पा सुर्वे
मोबाईल, स्मार्टफोनच्या जमान्यात हस्ताक्षर ही कला मागे पडत असताना प्रसिद्ध संगीतकार मिलिंद जोशी यांनी सुमारे 125 कविता स्वहस्ताक्षरात लिहून काव्यसंग्रह साकारला आहे. ‘असंच होतं ना तुलाही…’ हा कवीच्या हस्ताक्षरातील पहिला काव्यसंग्रह आहे. त्याचा प्रकास मिलिंद जोशी यांनी उलगडला.
स्वहस्ताक्षरात काव्यसंग्रह साकारण्याची संकल्पना कशी सुचली?
– गेली अनेक वर्षे माझी गीतकार, संगीतकार, चित्रकार अशी कलेच्या प्रांतातील मुशाफिरी चालू आहे. मी अनेक नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन मालिका, जिंगल्स यांना संगीत दिलंय. चित्रकार असल्याने काही पुस्तकांसाठी मुखपृष्ठ चित्रण केलेय. अगदीच विस्ताराने सांगायचं झालं तर अश्रूंची झाली फुले, ठष्ट, टॉम ऍण्ड जेरी, गेट वेल सून, माझी माय सरसोती, लुकाछुपी, डिअर आज्जो आदी नाटकांना संगीत दिलंय. बिनधास्त, सेकंड इनिंग, अशाच एका बेटावर, शेंटिमेंटल अशा काही चित्रपटांनाही संगीत दिलंय. हे सगळं सुरू असताना माझे काव्यलेखनही सुरू असायचे. त्यात कधी खंड पडला नाही. माझ्या कविता मी फेसबुकसारख्या सोशल माध्यमावर पोस्ट करायचो. लोकांना त्या आवडायच्या. या कवितांच्या लेखन शैलीबद्दल लोक मला विचारायचे की हे कोणते अॅप आहे. कोणता फॉन्ट वा सॉफ्टवेअर आहे? मी त्यांना सांगायचो हे कोणतेही अॅप नसून माझे हात आहेत. त्यातूनच काव्यसंग्रह हस्ताक्षरात करण्याची कल्पना सुचली. बुकगंगा पब्लिकेशनला ही कल्पना सांगितली. त्यांनीही ती उचलून धरली. येत्या 20 डिसेंबर रोजी ‘असंच होतं ना तुलाही…’ हा माझ्या हस्ताक्षरातील काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. याआधी आपल्याकडे कवीच्या हस्ताक्षरातील पुस्तक झालेले नाही. ललित पुस्तक लेखकाच्या स्वहस्ताक्षरात प्रकाशित झालेले असेल किंवा लेखकाने एखादे पान स्वहस्ताक्षरात लिहिण्याचे प्रयोग झालेले आहेत. पण अख्खा कवितासंग्रह कुणी हस्ताक्षरात लिहून काढलेला जाणकारांच्या माहितीत नाही. म्हणूनच हा अनोखा प्रयोग मला करावासा वाटला.
अशा पद्धतीचा काव्यसंग्रह साकारताना कोणती काळजी घेतली?
– गेल्या 15 महिन्यांपासून मी काव्यसंग्रहाच्या या प्रोजेक्टकर काम करीत आहे. कविता लिहून काढायला वेळ लागला. बरं त्या लिहिताना त्याची कॅलिग्राफी वाटता कामा नये. फक्त सुवाच्च अक्षर वाटलं पाहिजे एकढंच डोक्यात पक्कं केलं, कॅलिग्राफीच्या वाटेवर गेलो की ते हस्ताक्षर खूप कलात्मक झाले असते. साधे, सोपे राहिले नसते. कॅलिग्राफी करायची नाही, असे मी ठरवले होते. तसेच फॉन्ट वाटावे इतकेही कोरीव असता कामा नये. मी काव्य गायनाचे अनेक कार्यक्रम करीत आलोय. याकेळी कविता सादर करताना सुरांची जागा माझ्या हस्ताक्षराने घेतलेय. यावेळी कविता गाऊन मी ऐकवणार नसून वाचायला देणार आहे. कवितेच्या मूडप्रमाणे हस्ताक्षर बदलते. काव्य बोलताना जशा भावना असतात, त्याप्रमाणे आवाजाचा पोत बदलतो. तसा फरक हस्ताक्षरात पडतो, तो मी पडू दिलाय. सहज मांडणी आणि वाचता येईल हे सूत्र कायम ठेवले.
‘असंच होतं ना तुलाही…’ यातील कविता आणि त्यांच्या आशयाविषयी काय सांगाल?
– ‘असंच होतं ना तुलाही…’ मध्ये मुक्तछंद, छंदबद्ध, गझल असे विविध प्रकारचे काव्य तुम्हाला काचायला मिळेल. प्रेमकाव्य, जीवनाबद्दलचे भाष्य, अस्तित्वाचे नानारंग कवितेच्या रूपात मांडलेले असल्याने प्रत्येक पान हा वेगळा अनुभव देऊन जाईल. उदाहरणासाठी
प्रारब्धाची वीण कुणाची
घट्ट कुणाची सैल
कुणि पाणवठ्यापाशी
तर कुणी दूर हजारो
किंवा
एक आठवण तू आल्याची
दुसरी आठवण तू गेल्याची
या दोन्हींच्या मध्ये
काळ वाट पाहत
तू येण्याची
किंवा मी जाण्याची
मानवी भावभावनांना साद घालणाऱ्या वा समकालीन अशा या कविता आहेत.
कवीच्या भूमिकेत असताना तुमच्यातील संगीतकार कसा मदतीला यायचा…
-शब्द, कविता माझ्यासाठी नवीन नाहीत. मी चालींवर खूपदा गाणी केली आहेत. जाहिरातींसाठी लेखन केलेय. काव्यगायन अनेक वर्षे करीत आलोय. कविवर्य बा. भ. बोरकर, इंदिरा संत, ग्रेस, आरती प्रभू यांच्या कविता वाचत, गात आलोय. त्या माझ्यात झिरपल्या आहेत. या कविता मी पुनः पुन्हा लिहीत रहायचो. माझ्यातील संगीतकारानेच कविता लिहिण्याची पद्धत विकसित केली. दिवंगत संगीतकार यशवंत देव माझे गुरू त्यांच्यासोबत अनेक आध्यात्मिक शिबिरांना गेलोय. त्यामुळे काही कविता स्पिरीच्युअल पद्धतीच्या आहेत. संगीतकार असल्याने ‘नादमयता’ हा मला फायदा झाला. कोणत्या शब्दानंतर कोणता शब्द यायला पाहिजे ते नुसते बडबडगीत वाटायला नको ही समज संगीतकार असल्यामुळे आली.
‘गाणारी गझल’ या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल?
– कवी सुरेश भट यांनी मराठी गझल रूजवून 50 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. भटांच्या नंतर मराठीत विपुल गझल लेखन झाले. मी स्वतः गझल लिहितो. ‘गाणारी गझल’ हा कार्यक्रम मी आणि माझी पत्नी गायिका मनीषा जोशी सादर करतो. गीतलेखन, गायन आणि मैफल हे सगळे माझ्या आवडीचे फॉर्म असल्याने हा कार्यक्रम माझ्यासाठी खास आहे. फक्त हार्मोनियम, तबला एवढय़ाच वाद्यांच्या साथीने ही मैफल रंगते. सुरेश भट, सदानंद डबीर, मिलिंद पांढरपट्टे, राधा भावे यांच्या आणि माझ्या काही गझला कार्यक्रमात सादर करतो. याआधी कवितेचं गाणं, रंग नवा असे कार्यक्रमही आम्ही केले आहेत.
























































