अटकेच्या भीतीने शिंदे गटाचा नगरसेवक साहिल चौगुले फरार; शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेतील शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने फरार झाला आहे. साहिलने विवाहित तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन गेल्या दोन वर्षांपासून तो तिच्यावर अत्याचार करीत होता. फरार असलेल्या साहिलला तातडीने अटक करा, अशी मागणी पीडित तरुणीने केली आहे.

साहिल चौगुले हा शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक आणि नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा पुतण्या आहे. घणसोली येथील तळवली गाव परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीने त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर नोंदवला गेला असला तरी रबाळे पोलीस साहिलवर कारवाई करण्याऐवजी त्याला या प्रकरणातून वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत. अद्यापपर्यंत पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. साहिलची पार्श्वभूमी ही गुंडगिरीची आहे. त्यामुळे त्याच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याने पोलिसांनी त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी पीडित तरुणीने केली आहे.

दोन वर्षांपूर्वी ही तरुणी साहिलच्या घरी काम करीत असलेल्या आपल्या आत्याला भेटण्यासाठी गेली असता साहिलने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला होता.

त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले होते. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तो दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करीत होता.

काही दिवसांपूर्वी साहिलने तिला वाशी येथील एका हॉटेलमध्ये बोलावून आपल्या वासनेचे शिकार बनवले होते. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.