ठाण्यातील निधड्या छातीचा शिवसैनिक, सदस्य नोंदणी रोखण्याचा मिंधे गटाचा डाव निष्ठावंत शिवसैनिकाने उधळला

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात मिंधे गटाच्या गुंडांनी बेसावध शिवसैनिकांवर हल्ले केल्याचे प्रकरण ताजे असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सदस्य नोंदणी रोखण्याचा प्रयत्नही मिंधे गटाने केला. मात्र निष्ठावंत शिवसैनिक प्रतिक राणे मिंधे गटाला सामोरा गेला आणि त्यांना चांगलेच सुनावले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या वागळे परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख प्रतीक राणे हा शिवसेनेच्या सदस्य नोंदणीचे काम करत होता. यावेळी मिंधे गटाचा माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांचा मुलगा यज्ञेश भोईर तेथे आला. त्याने प्रतीक राणे याला इथे ‘सदस्य नोंदणी का करतो?’, असे विचारत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र निधड्या छातीचा निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या प्रतिक राणे त्यांना चांगलेच सुनावले.

‘मी माझ्या पक्षाचे काम करत आहे. मला कोणीही रोखू शकत नाही. मी काय करावे हा माझा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या गटाचे काम करा, मी माझ्या पक्षाचे काम करतो’, असे प्रतिक राणेने मिंधे गटाला सुनावले.

‘कोरोना संकटात एकनाथ शिंदे इथे आले’, असे मिंधे गटाच्या भोईर याने सांगताच निष्ठावंत प्रतिक राणेनेही त्याची बोलती बंद करणारे उत्तर दिले. ‘होय, त्यांना आम्ही शिवसेनेने निवडून दिले आहे. त्यांनी काम करायलाच हवे. ते आमच्या शिवसेना पक्षातून निवडून आले होते, म्हणून काम करत होते. त्यामुळे शिवसेनेची सदस्य नोंदणी करण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही’, असे सणसणीत उत्तर प्रतिक राणेने दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


दरम्यान, विभागप्रमुख प्रतिक राणे याने गेल्या अवघ्या 2 दिवसात वागळे विभागात 500 हून अधिक सदस्यांची नोंदणी केली आहे. तसेच आगामी काळात हजारो शिवसेना सदस्य नोंदवण्याचा निर्धार राणेने केला आहे.