
कळंब तालुक्यातील शिराढोण व गोविंदपूर मंडळातील गावांना काल बुधवारी सायंकाळी वादळी वाऱयासह अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. एकीकडे महाराष्ट्रावर कोरोना व्हायरसचे संकट असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा तोंडचा घास काढून घेतला आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकासह आंबा, मोसंबीसह द्राक्ष बागाचे यामध्ये मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पार उध्दवस्त झाला आहे.
बुधवार सायंकाळी कळंब तालुक्यातील शिराढोण, गोविंदपूर मंडळातील गावासह वाशी तालुक्यातील कांही गावांना वादळी वाऱयासह अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. यामध्ये या गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांची काढणी सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी उपटून शेतामध्ये आडवी टाकली होती तर अनेक शेतकरी गहू, हरभरा या पिकाची रास करत होते. आंबा बागा या फळधारणेच्या अवस्थेत असून आंब्यास छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या होत्या तसेच मोसंबी व द्राक्ष बागा या काढणीस आलेल्या असताना निसर्गाने नेम साधला आहे.
यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीनसह इतर पिके काढणीवेळी अवकाळी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकेही वाया गेली होती. मात्र शेतकऱ्यांनी खचून न जाता रब्बी हंगामातील पिके तर हाती येतील या विश्वासातून पेरणी केली होती. विविध फवारण्या, रात्रीच्या वेळी शेतात जावून पिकांना पाणी घालून ही पिके वाढवली होती. मात्र रब्बी हंगामातील ही पिके काढणीच्या वेळी निसर्गाने वेळ साधली असून एका रात्रीत होत्याचे नव्हते केले आहे.
तालुक्यातील नागुलगाव शिवारात गणेश संभाजी पाटोळे या शेतकऱयाने चार एकर द्राक्ष बाग तळहाताच्या फोटाप्रमाणे सांभाळली होती. वेळेवर औषध फवारणी करुन दृष्ट लागण्यासारखी आली होती. पण अचानक निसर्ग कोपला आणि गारपिटीमुळे पुर्ण बागच गळाली. गाराबरोबर द्राक्षाचा सडा पडला. तर हासेगाव शिरढोण येथील शेतकरी आण्णासाहेब मळगे यांच्या शेतात दोन एकर टरबुज होते. त्यांनी मोठा खर्च करून हे सांभाळले होते. व्यापारी मागणी करुन जात होते दोन दिवसात कलींगड काढणार होते परंतु रात्रीतुन होत्याचे नव्हते झाले. अवकाळी पाऊस गारासह आला आणी सर्व उद्धवस्त झाले. जवळपास चाळीस टन माल निघाला असता असे मत मळगे यांनी दै. सामनाशी बोलताना सांगीतले. तसेच तालुक्यातील नागुलगाव येथील विनायक बाजीराव भोरे यांचे काढलेले एक एकर बटाटे गाराने पुर्ण खराब झाले आहेत.
नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश…
आवकाळी पाऊसा व पारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी दिले. त्यानुसार प्रशासनाने संबंधित तलाठय़ांना पंचनामे करण्याची सुचना दिली आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी नुकसान झालेल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन तसेच शेतकऱयांना धीर देत नुकसानीची पाहणी केली. यावेळी झालेले नुकसान सांगाताना शेतकऱयांना अश्रू अनावर होत होते. यावेळी घाबरु नका, धीर सोडू नका, ठाकरे सरकार तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही एकटे नाहीत, शिवसेना तुम्हाला वाऱयावर सोडणार नाही, असा धीर खासदार व आमदारांनी शेतकऱयांना दिला. यावेळी उपविभागीय अधिकारी आहिल्या गाठाळ, तहसीलदार मंजुषा लटपटे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब जाधवर, पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील, मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
शिराढोण येथेही नुकसानीची पाहणी
बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने शिराढोण व परिसरात मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे. काढणीस आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकासह मोसंबी व आंबा बागेचेही मोठे नुकसान झाले आहे. येथील प्रगतीशील शेतकरी राजेंद्र मुदंडा यांच्या शेतातील मोसंबी तसेच आंबा बागेचे या अवकाळी पावसात मोठे नुकसान झाले आहे. मोसंबी बाग काढणीच्या अवस्थेत असल्याने व काल आलेल्या सोसाटय़ाच्या वाऱयाने मोठय़ा प्रमाणात मोसंबी गळून पडली असून गारपिटीने झाडावर असलेल्या मोसंबीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आंब्याची बागही सध्या फळ धारणेच्या अवस्थेत असल्याने व काल झालेल्या अवकाळी गारपिटीने आंबा बागेचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी या बागेस भेट देवून नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानीचा वस्तूनि‰ अहवाल तयार करुन तो शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या.



























































