
शिर्डीत श्री साईबाबा यांच्या चार दिवसीय पुण्यतिथी उत्सवाची आज दहिहंडी फोडून सांगता झाली. यावेळी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री आणि त्यांचे पती प्राप्तिकर विभागाचे सह आयुक्त संजय धिवरे यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. या चार दिवसीय पुण्यतीथी उत्सावा दरम्यान साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर लाखो भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नासिक संजय धिवरे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी, साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.
पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या भिक्षा झोळीत ग्रामस्थ व साईभक्तांनी भरभरुन दान दिले. धान्य आणि रोख रक्कम मिळून 4 लाख 21 हजार 833 रुपये इतकी देणगी भिक्षा झोळीव्दारे प्राप्त झाली. तर उत्सवकाळात सुमारे 2 लाख साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर 1 लाख 95 हजार 242 लाडू प्रसाद पाकीटांचा साईभक्तांनी लाभ घेतला. याबरोबरच श्री साईप्रसादालयात सुमारे 1 लाख 60 हजार साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा व अल्पोहार म्हणून 43 हजार 675 अन्नपाकीटांचा साईभक्तांनी लाभ घेतलेला आहे.

























































