
>> शिरीष कणेकर
या बाबतीत मी अगदीच हा आहे हे मला माहीत होतं. पण आता ते इतरांनाही कळलंय. त्यापेक्षा देवानं मला मुलगी म्हणून जन्माला घातलं असतं तर काय बिघडलं असतं? माझं पहिलं नावही बदलावं लागलं नसतं. मुलांना आणि मुलींना दोघांना ते चालतं. बघा- शिरीष कणेकर व शिरीष पै. मुलगी असतो तर ‘इश्श, काहीतरीच काय!’ असे सेमी-निषेधाचे उद्गार काढून मी आल्या प्रसंगातून अंग काढून घेऊ शकलो असतो.
इंग्रजी चित्रपटात उत्तान प्रणयप्रसंग सुरू झाले की अचूक टायमिंग साधून मी टॉयलेटच्या बहाण्यानं बाहेर पडायचो. पडद्याच्या फटीतून पाहून तो धुंद प्रणयप्रसंग संपल्याची खात्री करून घेऊन मगच मी अंधारगृहात पुनः प्रवेश करायचो. केवळ इंग्रजी चित्रपटालाच मला टॉयलेटला जावं लागतं. हिंदीला मी एकदाही न उठता मस्त बसून असतो हे माझ्या मित्रांच्या प्रथम लक्षात आले. (कारण ते ‘त्या’ सीनसाठीच आलेले असत.) त्यांनी माझी बेदम टर उडविली. मी लाजून चूर झालो.(चित्रपटांतील नायिकांनाही असे पैसे घेऊन लाजता आले नसते.) कशी खुल्लम खुल्ला बघू शकतात ही माणसं? काही खाजगी म्हणून गोष्ट असते की नाही? बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवून आंघोळ कराल की काय?…
मी माझा एकपात्री कार्यक्रम करायला बँकाकला गेलो होतो. कार्यक्रम केला आणि परत आलो. माझ्या मित्रांनी मात्र मला परतल्यावर जिभल्या चाटीत विचारलं-, ‘आणि काय काय केलंस?’
‘फिरलो. आइस्क्रीम खाल्लं.’ मी खरं ते सागितलं.
त्यांच्याकडून मला कळलं की बँकॉक हे कामराज्याचं दुसरं नाव आहे. जवळच असलेलं पटाया ही या कामराज्याची म्हणे राजधानी आहे. तिथे जाऊन मनुष्यदेहाचं सार्थक केल्याशिवाय पर्यटकाच्या पिंडाला कावळा शिवत नसतो. बँकॉकला जाऊन पटायाला न जाणे म्हणजे दिल्लीला जाऊन ताजमहाल न पाहण्यासारखे आहे. माझ्या स्थानिक यजमानानं मी न सांगताच माझं पटायाचं तिकीट काढून ठेवलं होतं. परंतु मी ताजमहल पाहायला न जाणारा असेन हे त्याला बिचाऱयाला कसं कळावं? आधीचे पाहुणे या तिकिटाच्या बदल्यात कृतकृत्य होऊन त्याच्या पायात कातडय़ाचे जोडे घालायला निघाले असतील. मीच असा कर्मदरिद्री. पटायात माझी आतुरतेनं वाट पहात असलेल्या नवयौवनांची किती बरे घोर निराशा झाली असेल? भाऊबीजेचा दिवस असता तर मी गेलोही असतो. पण पटायाला न जाता घरी निक्रिय बसून मी नेमकं काय साधलं? चारित्र्य-संवर्धन? मीच एकदा लिहिलं होतं – ‘चारित्र्य म्हणजे काय? जे गमावण्याची संधीच मिळत नाही केवळ म्हणून टिकून रहातं ते चारित्र्य!’ संधी मिळून ती निर्दयीपणे लाथाडून जे टिकतं त्याला भ्याडपणा म्हणतात. हाच भ्याडपणा नंतर समाजात आपल्या सत्चारित्र्याची पताका म्हणून मिरवायचा असतो.
मी कार्यक्रमासाठी ऍमस्टरडॅमला (कोपरखैरणेच्या थोडं पुढे!) गेलो होतो. ऍमस्टरडॅम ही नेदरलँडची राजधानी. माझं भौगोलिक ज्ञान इथे सुरू होते व इथेच संपते. (नागालँड व नेदरलँड वेगळे म्हणे.) दिवसा मला ‘तुलिप’ बगीचे बघायला घेऊन गेले. फुलांच्यात बसून मी घरचा डबा खाल्ला. (‘डॅम फुलां’च्यात बसून खायची सवय होतीच.) झगमगत्या रात्री मला व माझ्या सहकाऱयाला एका क्लबसदृश जागेत सोडण्यात आले. मला वाटलं आत काही खेळ वगैरे असतील. पण भलतेच होते. माझ्या मागे बसलेल्या स्पॅनिश की कुठल्याशा पोरी खिदळत होत्या, चित्कारत होत्या, किंचाळत होत्या. त्यांना कसला एवढा आनंद होत होता कोण जाणे. मी या हर्षवायू झालेल्या पोरींकडेच आवासून पहात होता. सातच्या आत घरात येण्याच्या संस्कृतीतून आलेल्या मला ही मध्यरात्रीनंतरची संस्कृती पाहून चक्कर आली.. माझ्या मनातले विचार त्या कुस्तीपटूंपर्यंत पोहोचले असते तर रिंग तोडून ते आले असते आणि लाथाबुक्यांनी त्यांनी मला तुडविले असते. मी जाईन तिथं माणसं मला झोडतात का हेच कळत नाही. रावळगावला शुगर फॅक्टरीत मला बुकलून काढण्यात आलं होतं. ‘हेअर कटींग सलूनमध्ये नुसत्या हजामतीव्यतिरिक्तही माझी वेगळी हजामत करण्यात आली होती. कोणाला तरी परीक्षा केंद्रावर सोडायला गेलो असताना पेपरफोडय़ा म्हणून मला बदडण्यात आलं होतं. वास्तविक आद्य पेपरफोडय़ा म्हणून माझा गौरव व्हायला हवा होता. त्यासाठी मी आमरण उपोषणाला बसावं तद्वत आमरण मटण खायला बसणार आहे.




























































