
रक्तपेढय़ांच्या समस्या, पालिका रुग्णालयातील मधुमेहावरील औषधांचा मोठा तुटवडा दूर करावा तसेच रुग्ण आणि कर्मचाऱयांच्या समस्या दूर करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील रुग्णालय सुविधांचे ऑडिट करा, अशी मागणी शिव आरोग्य सेनेच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन केली.
शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, सरचिटणीस जितेंद्र सकपाळ, उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्यमंत्री आबिटकर यांची भेट घेऊन रुग्णालयातील समस्यांबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत समस्या सोडविण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले. यावेळी मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक अमोल वंजारे, मुंबई सहसमन्वयक प्रकाश वाणी, पुणे जिल्हाध्यक्ष आबा शेळके, ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक प्रशांत भुईबर, समन्वयक एकनाथ अहिरे, चंद्रकांत हळदणकर उपस्थित होते.