
वीरशैव धर्मातील एक प्रसिद्ध महिला संत अक्कामहादेवी. त्या शिवाच्या परमभक्त होत्या. आपल्या 430 श्लोकांमधून त्यांनी संपूर्ण परमार्थ उलगडला आहे. ‘माझ्या शरीरावर केवळ माझा हक्क आहे.’ हे त्यांचे ठाम मत होते. आपले मत पतीसमोर मांडत दिगंबर अवस्थेत राजपाट सोडणारी पहिली स्त्री संत म्हणजे अक्कामहादेवी होत. त्यांनी दक्षिणेतल्या विद्रोही साहित्यातील ‘वचन साहित्य’ ही परंपरा सुरू केली. आयुष्यभर त्या दिगंबर अवस्थेतच वावरल्या. आपल्या लांबसडक केसांनी आपलं शरीर झाकून त्या भक्तीसेवेत रममाण झाल्या. त्यांनी आयुष्यभर चेन्नमल्लिकार्जुनाची (शिव) भक्ती केली. संत मीराबाईप्रमाणेच त्या शंकरालाच आपला पती मानत होत्या. शिवभक्तीचे आगळे रूप त्यांनी आपल्या आचरणातून सिद्ध केले.




























































