पर्यटन वाढले तरच देश प्रगती करेल! – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील पर्यटन हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात सेवा, सुविधा पुरविणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहेत. राज्यातील पर्यटन वाढले तरच देश प्रगती करेल, असा विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

इंडियन असोसिएशन ऑफ टूर्स ऑपरेटर्स या संस्थेच्या 38व्या वार्षिक परिषदेत ‘पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा शोध’ या विषयावरील चर्चासत्रात आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रामध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, कृषी पर्यटन विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग तावरे, ‘लेमन ट्री’चे अध्यक्ष विक्रमजित सिंह हे सहभागी झाले होते. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, राज्यातील पर्यटन हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक राज्यात पर्यटन क्षेत्राला संधी आहेत. या पर्यटनाच्या माध्यमातूनच त्या-त्या राज्यातील संस्कृती, धर्म, संस्कार, ऐतिहासिक वारसा यांची माहिती मिळते. राज्यातील प्रत्येक जिह्यात, तालुक्यात आणि गावागावांत पर्यटन क्षेत्र आहे. त्याचा विकास होणे गरजेचे आहे. देशाची लोकसंख्या वाढत चालली असून 15 ते 20 वर्षांत देशाची लोकसंख्या जगात सर्वाधिक असणार आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातूनच बेरोजगार तरुण, युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळताच पर्यटन क्षेत्र वाढीच्या दृष्टीने पॅरेबियन पॉलिसी राबविण्याचा निर्णय घेतला. लायसन्स मिळविण्यासाठी असलेल्या 80 अटी रद्द करून त्या 19वर आणण्यात आल्या. 9 प्रमाणपत्रे सादर करताच परवानगी देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. पर्यटन क्षेत्रात सेवा, सुविधा पुरविणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. पर्यटन क्षेत्रासोबत औद्योगिक पर्यटनदेखील महत्त्वाचे आहे. कोविडच्या दोन वर्षांच्या काळात संकटात सापडलेल्या पर्यटन क्षेत्राने पुन्हा भरारी घेतली आहे. पर्यटनाच्या माध्यमातूनच माणूसपण जपण्याची संधी मिळते. पर्यटन वाढले तरच देश प्रगती करेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.