चिनी बनावटीचे विषारी फटाके, वस्तू विक्रीसाठी ठेवू नका, गांधीनगरमधील व्यापाऱ्यांना शिवसेनेचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात बंदी असतानाही विषारी रासायनिक पदार्थांचा समावेश असलेल्या चिनी बनावटीचे फटाके अवैध मार्गाने येथे विक्री होताना आढळतात. त्यामुळे प्रदूषणासह आरोग्यावर परिणाम करणाऱया अशा चिनी बनावटीचे फटाके आणि माल विक्रीस ठेवू नये, असे आवाहन करवीर शिवसेनेच्या वतीने व्यापाऱयांना करण्यात आले आहे.

हिंदुस्थानात गेल्या काही वर्षांपासून चायनीज फटाके मोठय़ा प्रमाणात आले आहेत. त्यामध्ये देशात बंदी असलेले विषारी रासायनिक पदार्थ मोठय़ा प्रमाणात आहेत. ‘एक्सप्लोझिव्ह ऍक्ट 2008’ नुसार परदेशी बनावटीचे स्फोटक पदार्थ बाळगणे आणि त्याची विक्री करणे हा दंडनीय अपराध आहे. केंद्र सरकारनेही या दिवाळीला या फटाक्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी हानिकारक आणि देशाची अर्थव्यवस्था कुमकुवत करणारे हे चिनी बनावटीचे फटाके विक्रीसाठी ठेवू नयेत तसेच देवदेवता आणि राष्ट्रपुरुषांच्या छायाचित्रांचे फटाके विक्रीसाठी ठेवू नयेत, असे आवाहन करवीर शिवसेनेच्या वतीने विक्रेत्यांना करण्यात आले. यासाठी आज गांधीनगरमधील होलसेल फटाकेविक्रेत्यांना त्यांच्या दुकानात जाऊन निवेदन देण्यात आले.

यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, शरद माळी, वीरेंद्र भोपळे, फेरीवाले संघटनेचे कैलाश जाधव, बाळासाहेब नलवडे, दीपक पोपटाणी, दीपक अंकल, योगेश लोहार, बाबुराव पाटील, किशोर कामरा, आबा जाधव, बंडू घोरपडे, सुनील पारपाणी, जितू चावला, नागेश शिरवटे, सागर माने, राजू जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.